नवी दिल्ली : महिलांबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडून (बीसीसीआय) हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयने या दोघांनाही २०-२० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड भरण्यासाठी हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल यांना ४ आठवडे म्हणजेच एक महिन्याची मुदत दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या आणि के.एल राहुल यांच्यावर लावण्यात आलेल्या २० लाख दंडापैकी १-१ लाख रुपये सीमेवर कार्यरत असताना शहीद झालेल्या सुरक्षा दलातील १० कॉन्स्टेबल यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर उरलेल्या १० लाख रुपयांची रक्कम क्रिकेट असोसिएशनच्या दृष्टिबाधितांसाठी असणाऱ्या क्रिकेट फंडात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या रकमेतून दृष्टिबाधित लोकांसाठी खेळाचे प्रमोशन करण्यात येणार आहे.


या दोघांना २०-२० लाख रुपयांचा दंड भरण्यासाठी बीसीसीआयकडून एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. परंतु वेळेत दंड न भरल्यास त्यांच्या सामन्यातील मानधनातून ही रक्कम कापली जाईल अशी माहिती लोकपाल डी. के. जैन यांनी दिली आहे.


काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी बॉलिवूड दिग्दर्शक करण जौहर याच्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी माफी मागितली होती. परंतु या दोघांविरोधात चौकशीची मागणी करण्यात आली होती तसेच तात्पुरते निर्बंध लागू केले गेले होते परंतु निर्बंध नंतर हटविण्यात आले. महिलांबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलला याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती.