मुंबई: यंदा आयपीएल 2022 ची प्रतिक्षा क्रिकेटप्रेमींना आहे. मात्र या सामन्यांवर कोरोनाचं सावट आहे. दुसरीकडे अनेक दिग्गज खेळाडूंनी आपली नावं ऑक्शनमध्ये नोंदवली नाहीत. त्यामुळे यावेळी आयपीएल कसं असणार हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आयपीएलसंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2022 चे सामने महाराष्ट्रात मुंबईत होणार हे निश्चित झालं आहे. मात्र यासंदर्भातील अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. याची अधिकृत घोषणा 20 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदाच्या 15 व्या हंगामात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. 


27 मार्चपासून सामने सुरू होणार असून मे अखेरपर्यंत हे सामने खेळवण्यात येणार आहेत. याशिवाय यंदाच्या आयपीएलसाठी टाटा टायटल स्पॉन्सर असणार आहे. या वर्षीपासून 10 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन संघ नवीन असणार आहेत. 


BCCI सध्या मुंबईतच आयपीएल घेण्याच्या विचारात आहे. कोरोनाचा संसर्ग मुंबईत कमी होत आहे. त्यामुळे भारताबाहेर तरी सध्या आयपीएलचं आयोजन करण्याचा कोणताही विचार नाही. IPL 2022 साठी खेळाडूंचा मेगा लिलाव 12-13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. 


मुंबईतील कसं आहे नियोजन


मुंबईमध्ये 3 स्टेडियम निश्चित करण्यात आले आहेत. वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाई पाटील स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत. गरज पडल्यास पुण्यातील स्टेडियमवर खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो असंही यावेळी सूत्रांनी सांगितलं. 


राज्यात सामने होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातवरण पाहायला मिळतंय. मात्र त्यांचा हिरमोड झालाय. यावेळेसही 15 व्या मोसमातील सर्व सामने हे क्रिकेट चाहत्यांशिवायच म्हणजेच बंद दाराआड खेळवण्यात येणार असल्याचंही म्हंटलं आहे. खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाचा कोणताही धोका संभवू नये, याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हंटलं जात आहे.