श्रीनिवासन यांच्या मुलीचा इतिहास, क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष
बीसीसीआयच्या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदावर पहिली महिला
चेन्नई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची मुलगी रुपा गुरुनाथ यांची तामीळनाडू क्रिकेट असोसिएशन (टीएनसीए)च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रुपा गुरुनाथ यांना टीएनसीएच्या ८७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. बीसीसीआयच्या कोणत्याही राज्य संघटनेमध्ये महिला अध्यक्ष बनणाऱ्या रुपा गुरुनाथ या पहिल्या महिला आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांची अध्यक्ष बनण्याची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.
तामीळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. निवडणूक घेत असताना सर्वोच्च न्यायालयाने एक अट घातली होती. त्यामुळे निवडणूक झाली तरी निकाल न्यायालयाच्या आदेशानंतरच घोषित करण्यात यावेत, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगतिलं होतं. रुपा गुरुनाथ यांनी बुधवारी नामांकन द्यायच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरला होता.
एकीकडे रुपा गुरुनाथ यांची अध्यक्षपदी निवड झाली असतानाच बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने टीएनसीएच्या नव्या संविधानाला लोढा समितीच्या शिफारसींनुसार चुकीचं सांगितलं आहे. टीएनसीएने ४ ऑक्टोबरपर्यंत संविधानावर पुन्हा काम करावं, ज्यामुळे त्यांना २३ ऑक्टोबरच्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल, असं प्रशासकीय समितीकडून सांगण्यात येत आहे. पण याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयच घेईल, असं टीएनसीएचे वकील म्हणत आहेत.
२० सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने टीएनसीएला नवीन अधिकारी नियुक्त करण्यासाठी निवडणूक घ्यायला परवानगी दिली होती. निवडणुकीचा परिणाम अंतिम आदेशासारखाच असेल, असं न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि एल नागेश्वर यांच्या खंडपीठाने सांगितलं होतं.