नवी दिल्ली : टीम मॅनेजमेंटकडून क्रिकेटर्सची यो-यो फिटनेस टेस्ट घेतली जाते. या टेस्टमध्ये पास होणाऱ्यांनाच टीममध्ये संधी दिली जाते. यो-यो टेस्टमुळे टीमबाहेर रहावे लागलेल्या युवराज आणि सुरेश रैना यांच्यासाठी आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे.


यो-यो टेस्टमध्ये पास तरीही...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यो-यो टेस्टमध्ये पास न झालेल्या रैना आणि युवराज या दोघांना टीम मॅनेजमेंटने संधी दिली नव्हती. मात्र, दक्षिण आफ्रिकेसाठी करण्यात आलेल्या टीमच्या घोषणेपूर्वी त्यांनी ही टेस्ट पास केली होती. दोघांचीही टीममध्ये निवड करण्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र, तसं झालं नाही.


युवराज आणि रैनासाठी चिंतेची बाब 


आता बातमी समोर आली आहे की, फिटनेससाठी आवश्यक असलेल्या यो-यो टेस्टचे नियम आणखीन कठोर करण्यात येणार आहेत. त्यामुळे जे प्लेअर्स सध्या टीममधून बाहेर आहेत त्यांच्यासाठी ही एक चिंतेचीच बाब आहे. अनेक प्लेअर्सला याच यो-यो टेस्टमुळे टीममध्ये जागा मिळवता आली नाही. त्यानंतर आता या टेस्टचे नियम आणखीन कठोर करण्यात आले आहेत.


फिटनेस टेस्टसाठी नवा स्कोर


बीसीसीआय लवकरच सीनिअर प्लेअर्सच्या फिटनेस टेस्टसाठी नवा स्कोर ठरवण्याच्या तयारीत आहे. सीनिअर प्लेअर्सला यो-यो टेस्ट पास करण्यासाठी आतापर्यंत कमीत कमी १६.१ स्कोर करणं अनिवार्य होतं. मात्र, आता हा स्कोर वाढवून १६.५ किंवा १७ करण्याची योजना आहे.


कॅप्टन आणि कोच आहेत समर्थक


क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात येत आहे की, आगामी वर्ल्डकपपूर्वी फिटनेससंदर्भात कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये त्यामुळे नियम कठोर करण्यात येत आहेत. तसेच कॅप्टन विराट कोहली आणि कोच रवि शास्त्री हे या टेस्टचे समर्थक आहेत. त्यामुळे यो-यो टेस्टचे नियम कठोर होणं हा युवराज आणि रैनासाठी एक चिंतेचा विषय ठरु शकतो.


नेमकी काय आहे ही यो-यो टेस्ट


कोणत्याही दौऱ्यासाठी टीमची निवड करण्यात येते. या निवडीदरम्यान टीम मॅनेजमेंटकडून क्रिकेटर्सची यो-यो फिटनेस टेस्ट घेतली जाते. या टेस्टमध्ये पास होणाऱ्या क्रिकेटर्सलाच टीममध्ये स्थान दिलं जातं.