दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत BCCI अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले...
आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : टीम इंडिया पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया ही मालिका खूप महत्त्वाची असेल कारण भारताने आफ्रिकेच्या भूमीवर आजपर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण सध्या कोरोना विषाणूचा एक नवा व्हेरिएंट ओमायक्रोनच्या आगमनाने, धोका वाढला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरूद्ध भारत हा रद्द होणार का असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. दरम्यान याबाबत आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे.
गांगुली यांचा मोठा खुलासा
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मंगळवारी सांगितलं की, सध्याचा दक्षिण आफ्रिका दौरा पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार असेल. आम्ही कोविड-19 च्या नव्या व्हेरिएंटच्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
कोविड-19च्या ओमायक्रोन नावाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. त्याची पहिली केस दक्षिण आफ्रिकेत नोंदवली गेली. गांगुली एका कार्यक्रमात म्हणाले, "आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार हा दौरा होईल. आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी अजून वेळ आहे. पहिली कसोटी 17 डिसेंबरपासून होणार आहे. आम्ही त्यात लक्ष ठेवून आहोत."
चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेत पोहोचणार टीम इंडिया
भारत 3 डिसेंबरपासून मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध दुसरी आणि अंतिम कसोटी खेळणार आहे. त्यानंतर 8 किंवा 9 डिसेंबरला चार्टर्ड फ्लाइटने जोहान्सबर्गला रवाना होणार आहे. गांगुली म्हणाले, “खेळाडूंचं आरोग्य आणि सुरक्षितता ही बीसीसीआयची नेहमीच पहिली प्राथमिकता राहिली आहे. येत्या काही दिवसांत काय होतं त्यावर आमची नजर आहे."