श्रीसंतसाठी आनंदाची बातमी, बंदी हटली
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आलेल्या श्रीसंतला दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आलेल्या श्रीसंतला दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयने श्रीसंतवरची बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी श्रीसंतवरची आजीवन बंदी हटवून ही बंदी ७ वर्ष करण्याचा निर्णय घेतला. श्रीसंतवर मागच्या ६ वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे.
डीके जैन आपल्या आदेशात म्हणाले, 'श्रीसंत जवळपास ६ वर्ष बंदीची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे तो बीसीसीआयच्या कोणत्याही क्रिकेट मॅच किंवा कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही. त्याचं वय ३० पेक्षा जास्त आहे. एक फास्ट बॉलर म्हणून त्याचा सर्वोत्तम काळ आता निघून गेला आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याची बंदी ७ वर्ष करण्यात आली आहे. ही बंदी पुढच्या वर्षी १३ सप्टेंबरला संपेल. तेव्हापासून श्रीसंतला क्रिकेट खेळता येऊ शकेल.'
श्रीसंतची आंतरराष्ट्रीय कारकिर्द ६ वर्ष राहिली. या ६ वर्षात वर्ल्ड कप जिंकलेल्या दोन्ही भारतीय टीममध्ये श्रीसंत होता. २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ सालच्या ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला, तेव्हा श्रीसंत भारतीय टीमचा सदस्य होता.
२०१३ सालच्या ऑगस्ट महिन्यात श्रीसंतवर बंदी घालण्यात आली. आयपीएलची टीम राजस्थानकडून खेळणाऱ्या श्रीसंत, अजित चंडीला आणि अंकित चव्हाण यांच्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली होती. श्रीसंतने या बंदीला न्यायालयात आव्हान दिलं होतं.
सर्वोच्च न्यायालयातही श्रीसंतला दिलासा मिळाला होता. एप्रिल महिन्यानत जस्टीस अशोक भूषण आणि केएल जोसेफ यांच्या खंडपीठाने जैन यांना तीन महिन्यात श्रीसंतच्या शिक्षेचा पुन्हा विचार करा, असे आदेश दिले होते.
श्रीसंतवर मे २०१३ साली राजस्थान आणि पंजाबमध्ये झालेल्या मॅचदरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप झाला होता. श्रीसंतने दुसऱ्या ओव्हरमध्ये १४ रन देण्यासाठी फिक्सिंग केली होती. याबदल्यात त्याला १० लाख रुपये मिळाले, असा आरोप पोलिसांनी केला होता. श्रीसंतने मात्र हे आरोप फेटाळले.
श्रीसंतने भारताकडून २७ टेस्ट, ५३ वनडे आणि १० टी-२० मॅच खेळल्या. यामध्ये श्रीसंतला १६९ विकेट मिळाल्या. श्रीसंतने टेस्टमध्ये ८७, वनडेमध्ये ७५ आणि टी-२० मध्ये ७ विकेट घेतल्या. २०११ साली श्रीसंत भारताकडून शेवटची मॅच खेळला होता.