सचिन-सौरव-लक्ष्मणची समिती बरखास्त, ही `त्रिमूर्ती` निवडणार टीम इंडियाचा प्रशिक्षक
बीसीसीआयने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समिती बरखास्त केली आहे.
मुंबई : बीसीसीआयने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची क्रिकेट सल्लागार समिती बरखास्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने आता नव्या क्रिकेट सल्लागार समितीची नेमणूक केली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. तर अंशुमन गायकवाड आणि शांथा रंगस्वामी हे या समितीचे सदस्य आहेत. टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक ही समितीच नेमेल.
क्रिकेट वर्ल्ड कपमधील पराभवानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकांसाठी अर्ज मागवले आहेत. यातील प्रमुख प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यासाठी चांगलेच कडक निकष ठेवले गेले आहेत. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने भारतीय टीमकडून किंवा आयपीएल स्पर्धेत किमान तीन वर्ष खेळलेलं पाहिजे. याखेरीज त्या माजी खेळाडूला ३० टेस्ट किंवा ५० वनडे मॅचचा अनुभव पाहिजे.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय हे ६० वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे आणि किमान दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव त्याच्याकडे असला पाहिजे. प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ही ३० जुलै आहे. सध्या कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना प्रशिक्षकपदासाठीच्या प्रक्रियेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे.
सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यामुळे ४५ दिवसांनी वाढवला आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिज दौरा आटोपल्यावर शास्त्रींचा कार्यकाळ संपेल. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बॉलिंग प्रशिक्षक भरत अरुण, बॅटिंग प्रशिक्षक संजय बांगर आणि फिल्डिंग प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा समावेश आहे.
दरम्यान रवी शास्त्री आणि सध्याचा सपोर्ट स्टाफ हे पुन्हा एकदा प्रशिक्षकपदासाठी अर्ज करु शकतात. टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि ट्रेनर शंकर बासू यांनी आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या कराराचं नुतनीकरण करु नये असं, या दोघांनी बीसीसीआयला वर्ल्ड कप सुरु असतानाच सांगितलं होतं. त्यामुळे बीसीसीआयला फिजिओ आणि ट्रेनर यांचीही निवड करावी लागणार आहे.