`काही खेळाडू अद्यापही IPL मोडमध्ये,` BCCI स्टार खेळाडूंवर प्रचंड नाराज, `जर तुम्ही...`
भारतीय संघातील काही खेळाडू रणजी ट्रॉफीला महत्व देत नसल्याने बीसीसीआय नाराज असल्याची माहिती आहे. बोर्ड आपली ही नाराजी खेळाडूंपर्यंत पोहोचवणार आहे.
भारतीय संघातील काही खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी इच्छुक नसल्याने बीसीसीय नाराज असल्याची माहिती आहे. एकीकडे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासारखे खेळाडू संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहेत. या प्रयत्नात दोघांनी काही शतकं ठोकत आपल्या कामगिरीची नोंदही करण्यास भाग पाडलं आहे. पण दुसरीकडे काही खेळाडूंनी संघाबाहेर बसवलेलं असतानाही ते प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यास नकार देत आहेत. रणजी ट्रॉफी खेळण्यात अजिबात रस न दाखवणाऱ्या या खेळाडूंवर बीसीसीआय प्रचंड नाराज आहे. आपली ही नाराजी ते या खेळाडूंपर्यंत पोहोचवणार असल्याचीही माहिती आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआय खेळाडूंना फिट असल्यास रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्याच्या संघाकडून खेळण्यास सांगण्याचा विचार करत आहेत. दरम्यान ज्या खेळाडूंना दुखापत झाली आहे त्यांना बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जावं लागणार आहे. तिथे त्यांना पुन्हा एकदा फिट करण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येईल.
"पुढील काही दिवसात सर्व खेळाडूंशी बीसीसीआय संपर्क साधणार आहे. जर ते भारतीय संघाकडून खेळत नसतील त्यांना रणजी ट्रॉफीत आपल्या राज्याकडून खेळण्यास सांगितलं जाईल. जे फिट नाहीत आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीतून सावरत आहेत त्यांना यातून सवलत देण्यात आली आहे. काही खेळाडू जानेवारी महिन्यापासून आयपीएल मोडमध्ये असल्याने बीसीसीय आनंदी नाही," असं एका सूत्राने सांगितलं आहे.
भारतीय संघाचा खेळाडू ईशान किशन याच्यावर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड टीका होत आहे. याचं कारण ईशान संघातून बाहेर असतानाही रणजी ट्रॉफी खेळताना दिसत नाही आहे. ईशान किशनच्या अनुपस्थितीत इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन सामन्यात के एस भरत (KS Bharat) आणि ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) यांना संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान ईशान किशनने संघ व्यवस्थापनाकडे विश्रांती मागितली होती. पण तेव्हापासून तो संघात परतलेलाच नाही. भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला (Rahul Dravid) ईशान किशन संघात कधी परतेल असं विचारण्यात आलं होतं. त्यावर त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला थोडं क्रिकेट खेळावं लागेल असं उत्तर दिलं होतं.
Cricbuzz मधील रिपोर्टनुसार, ईशान किशन गेल्या काही आठवड्यांपासून बडोदामधील रिलायन्स स्टेडिअममध्ये पांड्या बंधूंसह सराव करत आहे. ईशान किशनच्या या कृत्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचं कारण हार्दिक पांड्या आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. आणि ईशान किशनही मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू किरण मोरे यांच्यानुसार, किशन त्यांच्या अकॅडमीत प्रशिक्षण घेत आहे.