वर्ल्ड कपसाठी तयार राहा, बीसीसीआयचे रहाणे-पंतला आदेश
ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे. या दौऱ्यामध्ये भारत ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. पण या दौऱ्यातले एकदिवसीय सामने म्हणजे यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपची रंगीत तालीम मानली जात आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारत फक्त १० एकदिवसीय सामने खेळणार आहे. पण ओपनर शिखर धवनचा फॉर्म आणि मधल्या फळीतील बेभरवशाचे खेळाडू पाहता बीसीसीआयनं अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतला वर्ल्ड कपसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
इंग्लंड लायन्सविरुद्धच्या भारत अ संघाचं पहिल्या तीन सामन्यांचं नेतृत्व अजिंक्य रहाणेला देण्यात आलं आहे. तर ऋषभ पंत इंग्लंड लायन्सविरुद्ध शेवटच्या २ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळेल. यानंतर पंत न्यूझीलंडला टी-२० मालिकेसाठी रवाना होईल. इंग्लंड लायन्सविरुद्ध रहाणे आणि पंत या दोन्ही खेळाडूंना वरच्या फळीत खेळायला बीसीसीआयनं सांगितलं आहे. भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये ५ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने होतील. २३ जानेवारीपासून तिरुवनंतपुरममध्ये इंग्लंड लायन्सविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.
कॉफी विथ करण या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. या दोघांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्यावरच्या कारवाईचा निर्णय होईल. या दोन्ही खेळाडूंना जास्त शिक्षा झाली तर दोघंही वर्ल्ड कपला मुकू शकतात. शिखर धवनचा फॉर्म आणि अंबाती रायुडूची ऑस्ट्रेलियातली कामगिरी यामुळेही भारतीय टीमच्या चिंता वाढल्या आहेत. त्यातच विशेषत: हार्दिक पांड्याला वर्ल्ड कपला मुकावं लागलं तर भारतीय संघाचं संतुलन आणखी खराब होईल, त्यामुळे वर्ल्ड कपसाठी रहाणे आणि ऋषभ पंतला वरच्या फळीत खेळण्याच्या तयारीला लागा, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये ऋषभ पंतनं दीडशतकी खेळी केली होती. तर अजिंक्य रहाणेला मोठी खेळी करता आली नसली तरी त्यानं मोक्याच्या क्षणी महत्त्वाच्या खेळी केल्या होत्या. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी या दोघांची नावं पुन्हा चर्चेत आली आहेत. त्यातच केएल राहुल आणि हार्दिक पांड्याचं प्रकरण रहाणे आणि पंतच्या पथ्थ्यावर पडू शकतं.