कुटुंबाबद्दलच्या त्या बातमीमुळे बेन स्टोक्स वृत्तपत्रावर भडकला
इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स त्याच्या कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत छापण्यात आलेल्या बातमीमुळे चांगलाच संतापला आहे.
लंडन : इंग्लंडचा ऑलराऊंडर बेन स्टोक्स त्याच्या कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत छापण्यात आलेल्या बातमीमुळे चांगलाच संतापला आहे. बेन स्टोक्सने याबाबत द सन या इंग्रजी वृत्तपत्राला खडे बोल सुनावले आहेत. यानंतर ब्रिटनमध्ये #DontBuyTheSun ट्रेन्ड होत आहे.
'त्या भयावह घटनेला विसरण्यासाठी माझ्या कुटुंबाला बरीच वर्ष लागली, पण वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने माझ्या घरी आणि न्यूझीलंडला जाऊन या जुन्या गोष्टी उकरून काढल्या. माझ्या नावाचा वापर करुन त्यांनी माझ्या, माझ्या आई-वडिलांच्या, पत्नीच्या आणि मुलांच्या वैयक्तिक आयुष्यावर हल्ला केला आहे,' असं स्टोक्स म्हणाला आहे.
बेन स्टोक्सची आई देब स्टोक्स यांचा आधीचा पती रिचर्ड डनकडून त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. हीच बातमी द सन या वृत्तपत्राने छापली. एप्रिल १९८८ साली स्टोक्सच्या जन्माआधी त्याची ८ वर्षांची सावत्र बहिण ट्रेसी आणि ४ वर्षांचा सावत्र भाऊ एन्ड्रयूला जीवे मारण्यात आलं. बेन स्टोक्से सावत्र वडिल रिचर्ड डन यांनी ही हत्या केली. रिचर्ड डन यांची ४९ वर्षांची मुलगी जॅकी डनच्या हवाल्याने द सनने हे वृत्त छापलं.
बेन स्टोक्स लहान असतानाच त्याचं कुटुंब न्यूझीलंडमधून इंग्लंडमध्ये स्थायिक झालं. या कारणामुळे स्टोक्स इंग्लंडकडून खेळतो. इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात स्टोक्सने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. योगायोगाने वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्धच इंग्लंडला विजय मिळाला.