आयुष्याच्या मैदानात या क्रिकेटरनेही केले होते कॅन्सरला चितपट
कॅन्सरशी लढा दिलेला केवळ युवराज हा एकमेव खेळाडू नाही. आणखीही एका भारतीय क्रिकेटपटूने कॅन्सरसोबत लढा दिला आहे. ज्याची फारशी चर्चा कधीच झाली नाही. कोण आहे तो खेळाडू घ्या जाणून.....
नवी दिल्ली : आजकाल क्रिकेटला मिळालेले ग्लॅमर पाहता कोणताही क्रिकेटपटू हा केवळ खेळाडू न राहता तो सेलिब्रीटी बनतो. त्यातही तो जर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करणारा ठरला तर, ही शक्यता कैक पटींनी वाढते. कोणत्याही क्रिकेटपटूचे रूपांतर एकदा का सेलिब्रेटीत झाले की, मग त्याचे व्यक्तीगत आयुष्यही प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून (सोशल मीडिया) चर्चीले जाते. उदाहरणच घ्यायचे तर, भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंहचे घेता येईल. मैदानावरच्या युवराजची एकूणच खेळी आणि 2007 मध्ये विश्वचषक खेचून आणण्यासाठी त्याने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. असे असले तरी सर्वात जास्त चर्चा झाली ती त्याने कॅन्सरसोबत दिलेल्या लढाईची. काही दिवस प्रसारमाध्यमांतूनही त्यावर बरेच लिहीले बोलले गेले. पण, कॅन्सरशी लढा दिलेला केवळ युवराज हा एकमेव खेळाडू नाही. आणखीही एका भारतीय क्रिकेटपटूने कॅन्सरसोबत लढा दिला आहे. ज्याची फारशी चर्चा कधीच झाली नाही. कोण आहे तो खेळाडू घ्या जाणून.....
एकेकाळचा भारताचा ओपनींग बॉलर अरूण लाल असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. 1 ऑगस्ट 2017ला हा खेळाडू 62 वर्षांचा झाला. अरूण लालचा जिंकण्यासाठीचा संघर्ष केवळ मैदानावरच राहिला नाही. तो मैदानाबाहेर त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातही राहिला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीमुळे चर्चेत असलेल्या अरूण लालच्या आजारपणाची चर्चा फारशी कधी झालीच नाही. पण, या वयातही त्यांनी कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी निकराने लढा दिला. त्यात ते यशस्वीही झाले. अरूण यांना कॅन्सर असल्याचे निदान त्याच्या वयाच्या 60व्या वर्षी झाले.
अर्थातच सर्वसामान्यपणे विचार करायचा तर, 60 हे वय कोणत्याही क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल तर, निवृत्त व्हायचे. या वयात शरीरालाही नाही म्हटले तरी, एक शिथीलता येते. पण, अरूण लाल खचले नाहीत. त्यांनी आपण केवळ मैदानावरच नाही तर, दैनंदिन आयुष्यातही खेळाडू असल्याचे दाखवून दिले. त्याच्यावर तब्बल 14 तास शस्त्रक्रीया सुरू होती. जी यशस्वी झाली. आजाराशी लढा देताना त्यांना क्रिकेटशी नाते तोडावे लागले. पण, शस्त्रक्रियेनंतर या खिलाडू वृत्तीच्या खेळाडूने पुन्हा एकदा क्रिकेटशी स्वत:ला जोडून घेतले. शस्त्रक्रियेत पूर्ण जबडा बदलावा लागला तरी, त्यांनी क्रिकेटची धवाते वर्णन (कॉमेंटरी) सरू केली. भारदस्त आवाज आणि वैशिष्ट्यपूर्ण कॉमेंटरी यामुळे अरूण लाला चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात.
अरूण लाल यांचा थोडक्यात परिचय
मूळचे मुरादाबादचे असलेले अरूण लाल कुटूंबियांसमवेत दिल्लीला स्थलांतरीत झाले. त्यांचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला होते. त्यामुळे वडिलांच्या बदल्यांमुळे स्थलांतरण टाळता येत नव्हते. क्रिकेटचा वारसाही त्यांना वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील रेल्वे संघासाठी रणजी क्रिकेट खेळत असत. त्याचे वडीलबंधू आणि भाचेही क्रिकेटचे रणजी खेळाडू राहिले आहेत. अरूण लालनी 1974मध्ये दिल्ली संघाकडून रणजी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. काही कालावधीनंतर ते कोलकाताला स्थलांतरीत झाले. तेथे त्यांनी पश्चिम बंगाल संघासाठी रणजी खेळणे सुरू केले.
दोन खोल्यांच्या घरात राहतात अरूण लाल
एकदा मीडियाशी बोलताना अरूण लाल यांनी आपण आजही कोलकाता येथील एल्जिन रोडवरच्या दोन खोल्यांच्या घरात भाड्याने राहात असल्याचे सांगितले होते. खरेतर त्यांचे निवास्थान हे घर म्हणावे असे नव्हतेच. ती एका गॅरेजची इमारत होती. जी दोन मजल्यांमध्ये विभागली होती. अलिकडेच मीडियाला त्यांचे दर्शन झाले तेव्हा ते आपली पत्नी दबजानी उर्फ रीनासोबत नजर अली लेनमध्ये राहात होते. जिथे त्यांचा अलिशान फ्लॅट आहे.
एक नजर करिअरवर
अरूण लाल 1982 मध्ये वन डे आणि टेस्ट डेब्यू केला. त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द मर्यादीत राहिली. भारताकडून त्यांनी 16 टेस्ट मॅचेस खेळल्या. ज्यात त्यांनी 729 धावा केल्या. त्यांनी 13 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्यांनी 122 धावा केल्या.