मुंबई : २०१७ मध्ये अनेक सामने जिंकत आणि अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या भारतीय संघाची २०१८ ची सुरुवात थोडी खराब झाली आहे.


भारताची खराब सुरुवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ आता परदेशात सामने खेळत आहे. पहिल्याच मालिकेत भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका भारताने २-० ने गमावली. यावर माजी खेळाडू बिशनसिंह बेदी यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.


सराव केला नाही


दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघाने सराव केला नाही. भारताला घरच्या मैदानावर श्रीलंकेसोबत सामना खेळण्याची गरज नव्हती. श्रीलंकेत जाऊन भारताने त्यांचा पराभव केला होता मग पुन्हा भारतात खेळून काय साध्य होणार होतं. त्याऐवजी भारतीय संघाने सराव करायला हवा होता. असं मत बिशनसिंह बेदी यांनी मांडलं आहे.


परदेशातल्या खेळपट्टया कठीण


आफ्रिकेतल्या खेळपट्ट्या या खेळण्यासाठी कठीण आहेत. भारतीय खेळाडूंनी स्थानिक रणजी सामन्यांमध्ये खेळून अथवा आफ्रिका दौऱ्यासाठी सराव करणं गरजेचं होतं. असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय संघांचा याआधीही परदेशात पराभव झाला आहे. त्यामुळे या पराभवाने खचून जाण्याची गरज नाही. 


शिकण्याची संधी


गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीमध्ये खराब कामगिरी ही भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरली. यातून भारतीय संघाला शिकण्याची संधी आहे. भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. येथेही आफ्रिकेसारख्याच खेळपट्ट्या आणि वातावरणाचा सामना भारताला करावा लागेल. त्यामुळे आफ्रिकेतला हा अनुभव चांगला कामाला येऊ शकतो, असं बेदी म्हणाले.


रहाणेवर प्रतिक्रिया


भारताच्या संघनिवडीवर देखील कोणाचंही नाव न घेता याचसोबत बिशनसिंह बेदींनी टीका केली. कसोटी क्रिकेटसाठी वन-डे सामन्यांतील कामगिरीचा निकष लावण्यात आलेला आहे असं वाटतं. अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला संघात जागा देण्यात आली. मात्र ४ डावांमध्ये त्याने फक्त ७८ धावा केल्या. कर्णधाराने कोणाला निवडावं हे सांगणं माझं काम नाही. मात्र संघाचा उप-कर्णधार राखीव खेळाडूंमध्ये बसणं ही गोष्ट मी मान्य करु शकत नाही. असं देखील त्यांनी म्हटलं.