मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती आज भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सहा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. त्यासाठी कपिल देव, रॉबिन सिंग सकाळीच मुंबईत दाखल झाले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं पारडं जड मानलं जातंय. शास्त्री यांच्यासह टॉम मुडी, माइक हेसन, लालचंद रजपूत, रॉबिन सिंग आणि फिल सिमॉन्स हे प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत आहेत. सर्व इच्छुक सल्लागार समितीपुढे सादरीकरण करतील. इच्छुक असलेल्या उमेदवारांपैकी रवी शास्त्री यांची कामगिरी प्रभावी राहिली आहे. २०१७पासून शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची कामगिरी उंचावली आहे. गेल्या वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकण्याचा पराक्रम दाखवला होता. 



२०१५मध्ये विश्वचषक स्पर्धेप्रसंगी रवी शास्त्री भारतीय संघाचे संघ संचालक असताना संघानं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, तर यंदाच्या विश्वचषकातही भारतानं उपांत्य फेरीपर्यंत वाटचाल केली. विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिका भारताला जिंकून दिल्यानंतर शास्त्री यांनी आपली दावेदारी आणखी मजबूत केल्याचं दिसून येत आहे. 



कर्णधार विराट कोहलीचाही रवी शास्त्री यांना पाठिंबा आहे. कपिल देव यांच्यासह शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा सल्लागार समितीत समावेश आहे. त्यामुळे कोण नवा प्रशिक्षक होणार की रवी शास्त्रीच पुन्हा होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.