`T20 वर्ल्डकपमध्ये विराट-रोहित ओपनिंगला येणं भारताला धोक्याचं, कारण..`; लारा स्पष्टच बोलला
Brian Lara On Virat Kohli Rohit Sharma: यंदाच्या वर्षी जून महिन्यामध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठीचा भारतीय संघ यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतरच निवडला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रायन लाराने एक इशारा भारतीय संघाला दिला आहे.
Brian Lara On Virat Kohli Rohit Sharma: वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराने भारतीय संघाला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आधीच धोक्याचा इशारा दिला आहे. जून महिन्यामध्ये सुरु होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जोडीकडे सलामीवीर म्हणून पाहत असेल तर हा विचार धोकादायक ठरु शकतो असं लाराने म्हटलं आहे. आपल्या या विधानामागील तर्कही त्याने समजावून सांगितलं आहे. सध्या रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आणि विराट कोहली आरसीबीच्या संघासाठी सलामीवीर म्हणून धामेकदार कामगिरी करत असतानाच लाराने हे दोघे एकत्र सलामीला येणं भारतासाठी धोकादायक कसं ठरु शकतं याबद्दल काय म्हटलंय पाहूयात...
केवळ एकदाच सालमीवीर म्हणून मैदानात उतरले
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सध्या मर्यादित षटकरांच्या क्रिकेटमधील आघाडीच्या क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. मात्र असं असलं तरी दोघांनीही 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर एकही अंतरराष्ट्रीय टी-20 सामना सामना खेळलेला नाही. याला एकमेव अपवाद ठरला तो मध्यंतरी भारतीय मैदानांवर आयोजित करण्यात आलेली अफगाणिस्तानविरुद्धची मालिका. हे दोघेही भारतीय संघासाठी टी-20 सामना खेळताना केवळ एकदाच सलामीवीर म्हणून एकत्र मैदानात उतरले आहेत. इंग्लंडविरुद्ध 2021 साली झालेल्या मालिकेतील या निर्णयाक टी-20 सामन्यामध्ये रोहित-विराटने 54 बॉलमध्ये 94 धावांची धमाकेदार पार्टरशीप केली होती.
..म्हणून विराट आणि रोहित एकत्र नको
मात्र आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत अशाप्रकारे विराट आणि रोहितने ओपनिंग करणं टाळलं पाहिजे असं मत ब्रायन लाराने 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना व्यक्त केलं आहे. या दोघांपैकी एकाने तरुण फलंदाजांबरोबर सलामीला उतरावं आणि एकाने मधल्या फळीत फलंदाजी करावी असं मत लाराने मांडलं. "माझ्या मते ते दोघेही उत्तम खेळाडू आहेत. असं असलं तरी सुरुवातीला तुम्ही एखाद्या तरुण खेळाडूला संधी दिली पाहिजे. आपलं कौशल्य आणि क्षमता सिद्ध करण्याची इच्छा असलेल्या एखाद्या तरुण खेळाडूला सुरुवातीला खेळण्याची संधी देऊन मधल्या फळीत त्या दोघांपैकी एखाद्य अनुभवी खेळाडूने फलंदाजीला यावं, ज्यामुळे त्याला डावाला आकार देण्याबरोबरच अगदी डाव संपेपर्यंत मैदानात राहता येईल. दोन्ही अनुभवी खेळाडू सलामीलाच खेळायला गेले आणि झटपट बाद झाले तर त्याचा नकारात्मक परिणाम संघाच्या कामगिरीवर होणार. माझ्यामते एकाला सलामीला पाठवावा आणि दुसऱ्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणं शहाणपणाचं ठरेल," असं लारा म्हणाला. पाच सामन्यांमध्ये विराटने 105.33 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माचीही कामगिरी उत्तम आहे.
गरज पाहून संघ निवडावा
संघाची गरज काय आहे त्यानुसार भारतीय संघाच्या फलंदाजांचा क्रम ठरला पाहिजे. केवळ नाव मोठं आहे म्हणून संघात कोणाला संधी देता कामा नये असं लाराने स्पष्टपणे मत मांडताना म्हटलं. 2022 च्या विश्वचषक स्पर्धेनंतरपासून शुभमन गिल, यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाडसारखे अनेक खेळाडू दमदार कामगिरी करत असून त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहता येईल. "तुम्ही तुमचा संघ निवडत असता तेव्हा तुम्ही बॅटींग ऑर्डरचा विचार केला पाहिजे. त्यातही कोणत्या खेळाडूने कोणती भूमिका पार पाडली पाहिजे यानुसार निवड केली जावे. त्या जागी कोण असेल याची काळजी करता कामा नये तिथे कोणीतरी जागा भरण्यासाठी असावा हे महत्त्वाचं. त्यांच्यासाठी काही ठरलेली कामगिरी निश्चित केलेली असेल. तुम्हाला पहिल्या 6 ओव्हरमध्ये 70 ते 80 धावा करायच्या असतील तर तुम्हाला तसे खेळाडू निवडावे लागतील. ती कामगिरी कोणता खेळाडू करतो हे महत्त्वाचं नाही," असं लारा म्हणाला.
भारताला 2007 नंतर यश नाही
भारताने 2007 साली पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकली. मात्र त्यानंतर त्यांना या स्पर्धेत फारसं यश आलेलं नाही. ही स्पर्धा यंदा 5 जून पासून न्यूयॉर्कमधील स्कॉटलंड येथे होणाऱ्या सामन्यापासून सुरु होणार आहे.