निवृत्तीच्या ६ वर्षानंतर सचिन मैदानात, पहिल्याच बॉलवर मारला फोर
क्रिकेट जगतातील सगळे विक्रम स्वत:च्या नावावर करणारा सचिन तेंडुलकर हा निवृत्तीच्या ६ वर्षानंतर पुन्हा मैदानात उतरला.
मेलबर्न : क्रिकेट जगतातील सगळे विक्रम स्वत:च्या नावावर करणारा सचिन तेंडुलकर हा निवृत्तीच्या ६ वर्षानंतर पुन्हा मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियातल्या बुशफायर क्रिकेट बॅशच्या मॅचसाठी सचिन उपस्थित होता. या मॅचमध्ये सचिन सहभागी झाला नसला, तरी इनिंग ब्रेकदरम्यान सचिनने एक ओव्हर बॅटिंग केली. सचिनने या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फोर मारला.
मेलबर्नमध्ये रविवारी पाँटिंग-११ आणि गिलख्रिस्ट-११ या टीममध्ये चॅरिटी बुशफायर बॅशची मॅच खेळवण्यात आली. सचिन या मॅचसाठी पाँटिंग-११ टीमचा प्रशिक्षक होता. मॅचच्या एक दिवसआधी ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू एलिस पेरीने सचिनला बॅटिंग करण्याची विनंती केली होती. एलिसच्या या विनंतीला मान देऊन सचिनने बॅट हातात घेतली.
सचिनने ५ मिनीटं बॅटिंग करण्यासाठी ४० मिनिटं नेट प्रॅक्टिसही केली होती. सचिनने एलिस पेरीच्या पहिल्या बॉलला फाईन लेगला लेग ग्लांझ मारत बॉल सीमारेषेबाहेर पाठवला. सचिनने दुसऱ्या बॉललाही लेग ग्लांझ मारून २ रन काढले. सचिनने तिसरा बॉल फाईन लेगला खेळला आणि चौथ्या बॉलला बॅकफूट पंच लगावला.
ओव्हरचे शेवटचे दोन बॉल एनाबेल सदरलँडने टाकले. सचिनने पाचवा बॉल कव्हरला आणि शेवटचा बॉल मिड ऑनच्या दिशेने खेळला. ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीमुळे प्राणी आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. त्यासाठी मदत म्हणून या मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅचची कमाई रेड क्रॉस मदत आणि पूनर्वसन फंडाला दिली जाणार आहे.