बारबाडोस : भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे. कॅरेबियन प्रिमियर लीगमधल्या (सीपीएल) बारबाडोस ट्रीडेंट्स टीमची मालकी विजय माल्ल्याच्या हातातून जाणार आहे. सीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेमियन ओ डोनोहेए म्हणाले की बारबाडोस ट्रीडेंट्सची मालकी दुसऱ्यांना देण्याबाबत इच्छुकांशी चर्चा सुरु आहे. आयपीएलच्याच धर्तीवर सुरु झालेल्या सीपीएलमध्ये ६ टीम सहभागी होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार बारबाडोस ट्रीडेंट्स टीमच्या नव्या मालकांची घोषणा २२ मेरोजी लंडनमध्ये होणाऱ्या प्लेअर ड्राफ्ट आधी घोषित होईल. माल्ल्याने बारबाडोस ट्रीडेंट्स टीमला २०१६ साली विकत घेतलं होतं. बारबाडोस टीमला मागच्या मोसमाचं मानधन आणि कराराची रक्कम अजून मिळालेली नाही. मागचा मोसम सप्टेंबर २०१८ साली संपला होता.


सीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गयाना क्रोनिकलशी बोलताना म्हणाले, 'ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. पण बारबाडोसशी संबंधित हा मुद्दा पुढच्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये निकाली काढला जाईल. आम्ही टीमचे मालक बदलू. पुढच्या दोन आठवड्यांमध्ये टीमला नवा मालक मिळेल अशी अपेक्षा आहे.'


बारबाडोस ट्रीडेंट्सच्या टीमकडून स्टीव्ह स्मिथ, मार्टीन गप्टील, हाशीम आमला, जेसन होल्डर, शाय होप, निकोलास पूरन, वहाब रियाझ खेळतात. खेळाडूंना पैसे न मिळाल्यामुळे बारबाडोस ट्रीडेंट्सचा खेळाडू ड्वेन स्मिथने सीपीएलवर टीका केली होती.


सीपीएलमधली दुसरी टीम ट्रिनबेगो नाइटरायर्डसचा मालकी हक्क कोलकाता नाइटरायर्डसचे मालक शाहरुख खान, जुही चावला यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनीकडे आहे.