India vs Pakistan On Lahore Ground: भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप जिंकून भारताच्या दिशेने रवाना झाला आहे. असं असतानाच आता भारताच्या पुढच्या दौऱ्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. खरं तर भारतीय संघाने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेव अपवाद वगळता पाकिस्तानी संघाला कायमच धूळ चारली आहे. अगदी नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. असं असतानाच आता भारतीय संघ पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच भूमीत मैदानात उतरणार आहे. मात्र यासंदर्भात संपूर्ण दौरा निश्चित झालेला नाही. मात्र पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅपियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेमध्ये हे संघ आमने-सामने येणार आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने मात्र नियोजित वेळापत्रकानुसार या स्पर्धेचं वेळापत्रक तयार केलं आहे. तसेच या वेळापत्रकामध्ये भारत आणि पाकिस्तान संघाच्या सामन्याची तारखही निश्चित केली आहे.


भारत आणि पाकिस्तानचा सामना कधी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने चॅपियन्स ट्रॉफी 2025 चं कच्चं वेळापत्रक तयार केलं आहे. हे वेळापत्रक आयसीसीला सोपवण्यात आलं आहे. यावेळेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने पुढील वर्षी 1 मार्च रोजी भारताविरुद्ध आपल्या संघाला मैदानात उतरवण्याचं नियोजन केलं आहे. मात्र यामधील सर्वात मोठी गोम ही आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अद्याप सहमती दर्शवलेली नाही. तसेच भारताने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यासंदर्भातही अद्याप होकार दिलेला नाही. मात्र पासीबीच्या नियोजित वेळापत्रकानुसार, 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जातील. तर 10 मार्च हा राखीव दिवस आहे. म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलसाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार असेल तर 19 फेब्रवारी 2025 आधी भारतीय संघाला रवाना व्हावं लागणार आहे.


कशी आयोजित केली जाणार ही स्पर्धा? कसं आहे वेळापत्रक


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी यांना टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या बार्बाडोस येतील अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या दौऱ्यादरम्यानच त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 15 सामन्यांचे संभाव्य वेळापत्रक आयसीसीकडे सुपूर्द केलं. भारतीय संघाचं वेळापत्रक तयार करताना सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय संघाचे सर्व सामने पाकिस्तानमधील लाहोरमध्ये खेळवले जातील. भारतीय संघ एकाच शहरामध्ये असेल असं सांगण्यात आलं आहे.


नक्की वाचा >> 'माझ्या निकाहनाम्यात होतं की, मी क्रिकेटबद्दल...'; पतौडींचा उल्लेख करत शर्मिला टागोर यांचं विधान


पीसीबीच्या नियोजनानुसार लाहोरमध्ये 7, कराचीमध्ये 3 आणि रावळपिंडीमध्ये 5 सामने खेळवले जाणार आहे. सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा पहिला सामना कराचीमध्ये खेळवला जाईल. तर दोन्ही उपांत्य फेरीतील सामने कराची आणि रावळपिंडीमध्ये खेळवले जातील. अंतिम सामना लाहोरमध्येच खेळवण्याचं नियोजन आहे. ही स्पर्धा एकदिवसीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये असल्याने रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे खेळाडू या दौऱ्याचा भाग असतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


नक्की वाचा >> 'त्या सामन्यानंतर मी रात्रभर ढसाढसा रडलो होतो, पुन्हा कधीच मी..'; गंभीरचा खुलासा


भारत-पाकिस्तान एकाच गटात


भारताच्या सर्व सामन्यांबरोबरच उपांत्य फेरीतील सामना आणि अंतिम सामनाही लाहोरमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन गट करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अ गटामध्ये आहेत. भारत आणि पाकिस्तानबरोबर अ गटात बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या संघाचा समावेश आहे. तर ब गटामध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तानच्या संघाचा समावेश आहे. 


नक्की वाचा >> Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'


बीसीसीआय परवानगी देणार का?


पाकिस्तानने 2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं होतं. मात्र हे यजमानपद श्रीलंकेबरोबर संयुक्तरित्या भूषवलं होतं. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. भारत सरकारने खेळाडूंना पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिल्याने श्रीलंकेचा पर्याय निवडण्यात आला. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनामध्ये सर्व सहभागी संघाचे क्रिकेट बोर्ड पाकिस्तानला समर्थन देतील असं निश्चित करण्यात आलं आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट बोर्डाचाही समावेश आहे. बीसीसीआय भारत सरकारबरोबर चर्चा करुन या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानमध्ये भारतीय खेळाडूंना पाठवण्यासंदर्भातील निर्णय आयसीसीला कळवणार आहे. आता यावर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.