Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..'

What Rohit Sharma Talks During Indian Team Huddle: सूर्यकुमार यादवने भारताने दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्मासंदर्भात हा खुलासा केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 3, 2024, 04:21 PM IST
Team Huddle मध्ये रोहितने World Cup Final आधी काय सांगितलं? सूर्या म्हणाला, 'त्याने आम्हाला..' title=
सूर्यकुमार यादवने केला खुलासा

What Rohit Sharma Talks During Indian Team Huddle: भारतीय संघाने 17 वर्षानंतर टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे. भारतीय संघाने बार्बाडोसच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेला सामना भारताने 7 धावांनी जिंकला. भारताचा हा चौथा वर्ल्ड कप आहे. यापूर्वी भारताने 1983, 2011 साली एकदिवसीय क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला आहे. तर पहिलावहिला 2007 चा वर्ल्ड कप आणि यंदाचा वर्ल्ड कप असे दोन टी-20 वर्ल्ड कप भारताने जिंकलेत. भारताच्या या विजयानंतर सर्वच स्तरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. या सामन्यातील विजयानंतर विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा यांनी टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एका क्षणी 30 बॉलमध्ये 30 धावांची गरज असताना भारतीय संघाने उत्तम गोलंदाजी आणि रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर सामना जिंकला. मात्र या सामन्यामध्ये संघाने केलेल्या चर्चेदरम्यान रोहितने संघ सहकाऱ्यांना काय सांगितलं होतं? यासंदर्भातील खुलासा मॅच विनिंग कॅच घेणाऱ्या सूर्यकुमारने केला आहे. 

सूर्याने अनेक प्रश्नांना दिली उत्तरं

भारताने टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर 'द इंडियन एक्सप्रेस'ला सूर्यकुमार यादवने विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये सूर्यकुमारने अनेक प्रश्नांना उत्तर दिली. विजयानंतर ड्रेसिंगरुममधील स्थिती काय होती? तो झेल पकडल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया? सर्वाधिक डान्स कोणी केला? यासारख्या प्रश्नांची उत्तर देण्याबरोबरच सूर्यकुमार यादवने सामन्याआधी रोहित काय म्हणाला होता याबद्दलचीही माहिती दिली. रोहित शर्माने संघ हर्डल करुन (गोलाकार आकारात) उभा राहतो तेव्हा तुम्हाला नेमकं काय सांगितलं होतं? असा प्रश्न सूर्यकुमार यादवला विचारण्यात आला. 

वर्ल्ड कप फायनलआधी रोहित हर्डलमध्ये काय म्हणाला?

"अंतिम सामन्याआधी त्याने आम्हाला साधेपणा कायम ठेवा असं सुचवलं होतं. "मी एकटा हे शिखर चढू शकत नाही. मला याचं शिखर गाठायचं असेल तर तुम्हा सर्वांच्या ऑक्सिजनची मला गरज पडेल," असं सूर्यकुमारने सांगितलं. "जे काही आहे ते तुमच्या पायांमध्ये, डोक्यांमध्ये आणि हृदयामध्ये आहे. हे सारं काही एकत्र करुन खेळात ओता. जरं हे झालं तर आजच्या या रात्रीबद्दल तुम्हाला आयुष्यात कधीच खेद वाटणार नाही," असं रोहित आम्हाला म्हणाला होता, अशी माहिती सूर्यकुमारने दिली.

नक्की वाचा >> 'त्या सामन्यानंतर मी रात्रभर ढसाढसा रडलो होतो, पुन्हा कधीच मी..'; गंभीरचा खुलासा

...म्हणून त्याच्यासाठी खेळावं असं प्रत्येकाला वाटतं

"मी मागील चार ते पाच वर्षात फार क्रिकेट खेळलो आहे. अगदी आयपीएल असो किंवा अंतरराष्ट्रीय क्रिकेट असो मी त्याच्याबरोबर बरंच क्रिकेट खेळलोय. तो सर्व खेळाडूंबरोबर उत्तमरित्या कनेक्ट करतो. तो मैदानात असो किंवा मैदानाबाहेर असो. अगदी हॉटेल रुमपासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत तो सर्वांबरोबर सहज कनेक्ट करतो. त्यामुळे जेव्हा कठीण परिस्थिती निर्माण होते तेव्हा तो (रोहित) आम्हाला पाठिंबा देईल, याची खात्री त्यांना असते. आपल्याला या माणसासाठी चांगला खेळ करायचा आहे, असं प्रत्येकाला वाटतं. तो सर्वांनाच सारखाच मान देतो," असंही सूर्यकुमारने न विसरता सांगितलं.