Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबतची महत्त्वाची अपडेट, 15 जूनपर्यंत...
Wrestlers protest Update : क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची बैठक झाली. या बैठकीत बृजभूषण सिंह यांच्यावर 15 जूनपर्यंत थेट कारवाईचे आश्वासन सरकारने दिले आहे. हे आंदोलनाला मोठे यश आले आहे. जर ही कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Wrestlers protest Update : जंतर मंतरवरील कुस्तीपटूंचं आंदोलन 15 जूनपर्यंत तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची बैठक झाली. या बैठकीत बृजभूषण सिंह यांच्यावर 15 जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करणार असल्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असून, 15 जूनपर्यंत सरकारने कारवाई न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
6 तासांच्या चर्चेत कारवाईचं आश्वासन
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी कुस्तीपटूंची आहे. आता क्रीडामंत्र्यांसोबत झालेल्या 6 तासांच्या चर्चेत कारवाईचं आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्र आणि कुस्तीपटू यांच्यातील संवाद सुरु झालाय. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी जवळपास सहा तास चर्चा झाली. यावेळी बृजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी वगळता उर्वरित सर्व मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या. ब्रिजभूषण यांच्यावर सहा कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले तर एका अल्पवयीन कुस्तीपटूने पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. बृजभूषण सिंह यांना अटक करण्यासाठी 23 एप्रिलपासून कुस्तीपटू आंदोलन करीत आहेत.
15 जूनपर्यंत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार
बृजभूषण सिंह यांच्या विरोधात दाखल तक्रारीच्या आधारावर 15 जूनपर्यंत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, तोपर्यंत कुस्तीपटूंनी आंदोलन करु नये असे या चर्चेत ठरले आहे. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सरकारने कारवाई केली नाही तर आंदोलन पुन्हा सुरु होईल, असा स्पष्ट इशारा केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या प्रस्तावावर अन्य सहकारी कुस्तीपटू, शेतकरी नेते व खाप पंचायतच्या सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे पुनिया याने सांगितले.
कुस्तीपटू आणि सरकार यांच्यात नेमकी काय झाली चर्चा?
दरम्यान, काल झालेल्या चर्चेनंतर कुस्तीपटू, प्रशिक्षक आखाडे आणि त्यांच्या समर्थकांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. जोपर्यंत महासंघाच्या निवडणुका होणार नाही. तोपर्यंत देशातील दोन कोचकडे जबाबदारी देण्यात यावी. यात एक सदस्य महिला राहील. तसेच खेळाडूंच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी महासंघात एक अंतर्गत समिती स्थापन करणार. या समितीच्या प्रमुखपदी महिला असेल असे ठरविण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात. या निवडणुकीत यात बृजभूषण यांना भाग घेता येणार नाही.