कोलकाता : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी याच्याविरुद्ध कोलकाता पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. मोहम्मद शमीविरोधात हुंड्यासाठी छळ आणि शारिरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी २२ जूनला होणार आहे. यामुळे शमीचं वर्ल्ड कपमधलं स्थान धोक्यात आलं आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहा यांच्यामध्ये मागच्या वर्षभरापासून वाद सुरु आहेत. मोहम्मद शमीचं प्रेमप्रकरण असल्याचा आरोप त्याची पत्नी हसीन जहाने केला होता. एवढच नाही तर मोहम्मद शमीच्या फोनमधील चॅटिंगचे स्क्रीन शॉटही हसीन जहाने सोशल नेटवर्किंगवर शेअर केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहा यांच्यामधले वाद मागच्यावर्षी ७ मार्चला चव्हाट्यावर आले होते. माझी क्रिकेट कारकिर्द संपवण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप शमीने केला होता.


हसीन जहाने ८ मार्च २०१८ साली मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात कोलकाता पोलीस स्टेशनमध्ये छळ, शारिरिक शोषण आणि मानसिक त्रास दिल्याचा खटला दाखल केला होता. मोहम्मद शमीने हे सगळे आरोप फेटाळून लावले होते.


मोहम्मद शमीच्या पत्नीने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोपही लावले होते. यानंतर बीसीसीआयने चौकशी पूर्ण होईपर्यंत शमीला करारबद्ध केलं नव्हतं. बीसीसीआयच्या चौकशीमध्ये शमीला क्लीन चीट देण्यात आल्यानंतर त्याला पुन्हा एकदा करारबद्ध करण्यात आलं. काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयने खेळाडूंसोबत नवा करार केला. यामध्ये शमीचे ग्रेड ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. ग्रेड ए मधल्या खेळाडूंना यंदाच्या वर्षी ५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.