शहीद जवानांवरून मोदींवर निशाणा, चेन्नई सुपरकिंग्सच्या सदस्याचं निलंबन
चीनच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांवरून पंतप्रधान मोदींवर टीका करणं आयपीएलच्या चेन्नईच्या टीममधल्या सदस्याला चांगलंच महागात पडलं
मुंबई : चीनच्या सीमेवर शहीद झालेल्या जवानांवरून पंतप्रधान मोदींवर टीका करणं आयपीएलच्या चेन्नईच्या टीममधल्या सदस्याला चांगलंच महागात पडलं आहे. चेन्नई टीमचे डॉक्टर मधू थोट्टाप्पिल्लिल यांनी वादग्रस्त ट्विट केलं होतं. 'शहीद जवानांच्या शवपेटिकांवरही पीएम केयर स्टिकर लावला जाईल का? हे पाहण्यासाठी मी उत्सूक आहे,' असं ट्विट थोट्टाप्पिल्लिल यांनी केलं होतं. वाद वाढल्यानंतर त्यांनी ट्विटर अकाऊंट लॉक केलं.
थोट्टाप्पिल्लिल यांच्या या ट्विटवर आक्षेप घेत अनेकांनी चेन्नईच्या टीमकडे तक्रार केली. डॉक्टर थोट्टाप्पिल्लिल चेन्नईच्या टीमचे फिजिओ आहेत का नाही? हे त्यांनी सांगावं. डॉक्टरी पेशामध्ये असणारी व्यक्ती एवढी असंवेदनशील कशी असू शकते? भारतीय जवानांच्या मृत्यूवर ते मस्करी कशी करू शकतात? असे अनेक प्रश्न चेन्नईच्या टीमला विचारण्यात आले.
मोठ्या प्रमाणावर टीका होत असल्याचं दिसून आल्यावर मग चेन्नई सुपरकिंग्सकडून अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून स्पष्टीकरण देण्यात आलं. 'चेन्नई सुपरकिंग्सने डॉक्टर मधू थोट्टाप्पिल्लिल यांचं सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे निलंबन करण्यात आलं आहे. डॉक्टर थोट्टाप्पिल्लिल यांच्या वैयक्तिक ट्विटबाबत चेन्नईच्या टीमला कल्पना नव्हती. चेन्नईची टीम त्यांच्या या ट्विटबाबत दिलगिरी व्यक्त करत आहे. हे ट्विट चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं आहे,' असं ट्विट चेन्नई सुपरकिंग्सकडून करण्यात आलं आहे.