मुंबई : महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. यावर त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, 'धोनी हा असा व्यक्ती आहे जो आपल्या जवळच्यांना बोलावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं सांगेल.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते म्हणाले की, जेव्हा धोनीला असे वाटेल की निवृत्तीची वेळ आली आहे, तेव्हा तो योग्य मार्गाने घोषणा करेल. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर काही लोकांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल अफवा पसरवल्या होत्या.


धोनीचे लहानपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी म्हणाले की, "धोनी हा असा माणूस आहे जो लोकांना फोन करेल आणि सांगेल की, मी निवृत्त होत आहे." हे कसे करावे हे त्याला माहित आहे. जेव्हा त्याला असे वाटले की आता निवृत्तीची वेळ आली आहे. तो बीसीसीआयला कळवेल आणि पत्रकार परिषद घेईल. ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व तो करेल. टेस्टमधून निवृत्त झाल्यावर त्याने तेच केले होते.'


'सोशल मीडियातील अफवांवर लक्ष देऊ नका. अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या ट्रेन्ड बनतात, परंतु शेवटी त्या अफवा असल्याचं समोर येतं. धोनीच्या मागे लोक का लागले आहेत हे मला माहित नाही. मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो आणि सांगू शकतो की जेव्हा तो निवृत्तीबद्दल विचार करेल तेव्हा तो आम्हाला सांगेल.'


यापूर्वी बॅनर्जी म्हणाले होते की, धोनी आयपीएल खेळत नसला तरी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात त्यांचा सहभाग असावा.


दरम्यान यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान होणारा टी -२० वर्ल्डकप कोरोनामुळे रद्द होऊ शकतो. अशा परिस्थितीत आयपीएल होण्याची शक्यता दिसू लागली आहे.