बर्मिंगहॅम : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना 9 धावांनी जिंकून सुवर्णपदक पटकावलंय. तर टीम इंडियाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलंय. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावरील अंतिम सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत गेला, पण ऑस्ट्रेलियाने दिलेलं 162 रन्सचं लक्ष्य भारताला गाठता आले नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 161 रन्स केले होते. प्रत्युत्तरात भारतीय टीमने शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्यांना केवळ 152 रन्स करता आले. टीम इंडियाच्या वतीने कर्णधार हरमनप्रीत कौरने 65 रन्सची कर्णधारी खेळी करत टीमला एका बाजूने रोखले. मात्र दुसरीकडे कोणीही उभं राहू शकलं नाही आणि शेवटी भारतीय टीमची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली.


भारताची तिसरी विकेट 118 च्या स्कोअरवर पडली आणि त्यानंतर संपूर्ण टीम 152 च्या स्कोअरवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने शेवटच्या 5 ओव्हरमध्ये सात विकेट्स गमावल्या. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने अवघ्या 43 चेंडूत 65 रन्स केले. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 33 चेंडूत 33 धावा केल्या.


याशिवाय सर्व फलंदाज अपयशी ठरले. टीम इंडियाची सलामीची जोडी शेफाली वर्मा (11) आणि स्मृती मानधना (6) यावेळी अपयशी ठरल्या. आणि याचाच फटका टीम इंडियाला सहन करावा लागला.


ऑस्ट्रेलियाचा डाव 


टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमची सुरुवात खराब झाली आणि अलिसा हिलीच्या रूपाने 9 रन्सवर पहिली विकेट गमावली. यानंतर मेग लॅनिंग आणि बेथ मुनी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 रन्सची भागीदारी करत डावाची धुरा सांभाळली. लॅनिंगने 26 चेंडूत 36 रन्सची खेळी खेळली.


त्यानंतर अॅश्ले गार्डनरने 25 रन्स करत ऑस्ट्रेलियन टीमला मोमेंटम मिळवून दिला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 175 रन्सपर्यंत मजल मारू शकेल असं वाटत होतं, परंतु भारतीय गोलंदाजांनी वेळोवेळी विकेट्स घेत दबाव कायम ठेवला. कांगारू टीमकडून बेथ मुनीने सर्वाधिक 61 धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.