Corona : पठाण बंधूंची गरजूंना मदत, तांदूळ आणि बटाट्यांचं वाटप
कोरोना व्हायरसमुळे भारतामध्ये ११७ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे भारतामध्ये ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२२१ वर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. या २१ दिवसांमध्ये हातावर पोट असलेले मजूर आणि रोजंदारी करणाऱ्यांपुढे मात्र अडचण निर्माण झाली आहे. अशा गरजूंसाठी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण आणि युसुफ पठाण धावून आले आहेत.
पठाण बंधूंनी गरजूंना १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाट्यांचं वाटप केलं आहे. बडोद्यामध्ये इरफान आणि युसुफ पठाण यांनी गरजूंना मदत केली. पठाण बंधूंप्रमाणेच इतर भारतीय खेळाडूंनीही कोरोनाचा सामना करण्यासाठी मदतीचे हात पुढे केले आहेत.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने गरजूंसाठी ५० लाख रुपयांचे तांदूळ दान करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख रुपये दिले, तर रोहित शर्मानेही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी रक्कम दिली. तर बीसीसीआयने पंतप्रधान सहाय्यता फंडाला ५१ कोटी रुपयांची मदत केली.
सौरव गांगुलीने याशिवाय कोलकाता इस्कॉनच्या मदतीने जवळपास २० हजार गरजूंना अन्नदान केलं. इस्कॉन कोलकात्याचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले, 'कोलकात्यामध्ये प्रत्येक दिवशी १० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या सौरव गांगुली यांना धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्कॉन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. दादाची ही सर्वोत्तम खेळी आहे. आम्ही त्यांना धन्यवाद देतो.'
इस्कॉन संपूर्ण देशात जवळपास ४ लाख गरजूंना अन्न देत आहे. याआधी सौरव गांगुलीने रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठामध्ये २० हजार किलो तांदूळ दान केले होते.