Corona : म्हणून गावसकरांनी पीएम फंडाला ३५ लाख, मुख्यमंत्री फंडाला २४ लाख रुपये दिले
भारतामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
मुंबई : भारतामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसविरुद्धच्या या लढाईमध्ये प्रत्येक जण आपलं योगदान देत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी एकूण ५९ लाख रुपयांची देणगी दिली आहे. यातली ३५ लाख रुपयांची देणगी ही पीएम केयर्स फंडाला तर २४ लाख रुपयांची देणगी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली.
सुनिल गावसकर यांनी मदतीसाठी हे आकडे का निवडले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. गावसकर यांच्या शतकांशी ही रक्कम जोडली गेल्याचं सांगण्यात येत आहे. सुनिल गावसकर यांनी भारतासाठी ३५ शतकं केली, त्यामुळे त्यांनी पीएम केयर्स फंडाला ३५ लाख रुपये दिले. तर मुंबईकडून खेळताना गावसकर यांच्या नावावर २४ शतकं आहेत, म्हणून त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २४ लाख रुपयांचं योगदान दिलं आहे.
सुनिल गावसकर यांनी केलेल्या या मदतीची माहिती दिली नाही, पण मुंबईचा माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदारने ट्विट करुन गावसकर यांनी मदत केल्याचं सांगितलं. 'एसएमजी (सुनिल मनोहर गावसकर) यांनी कोव्हिड राहत कोषसाठी ५९ लाख रुपये दान केल्याचं समजलं, यातले ३५ लाख रुपये पीएम केयर्स फंडासाठी तर २४ लाख रुपये महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आले,' असं ट्विट मुजुमदारने केलं आहे.
दुसरीकडे विराट कोहली, चेतेश्वर पुजारा यांनी त्यांनी केलेल्या मदतीची आकडेवारी जाहीर केलेली नाही. बाकीच्या क्रिकेटपटूंमध्ये इरफान पठाण आणि युसुफ पठाण या बंधूंनी गरजूंना १० हजार किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे दिले.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने गरजूंसाठी ५० लाख रुपयांचे तांदूळ दान करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख रुपये दिले. तर बीसीसीआयने पंतप्रधान सहाय्यता फंडाला ५१ कोटी रुपयांची मदत केली.
रोहित शर्माने पीएम केयर्स फंडासाठी ४५ लाख रुपये, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये, फीडिंग इंडियासाठी ५ लाख रुपये, स्ट्रे डॉग्ससाठी ५ लाख रुपये मदत केली आहे.