मुंबई : कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत हजारो जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर लाखो लोकं कोरोना संक्रमित झाले आहेत. कोरोनाच्या या लढाईचा सामना करण्यासाठी अनेक क्रिकेटपटू पुढे आले आहेत. या क्रिकेटपटूंनी कोरोनाग्रस्त आणि गरजूंना मदत म्हणून आर्थिक मदत केली आहे. याचसोबत हे क्रिकेटपटू त्यांच्या चाहत्यांनाही मदतीचं आवाहन करत आहेत. युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनीदेखील शाहिद आफ्रिदी फाऊंडेशनला मदत करायला सांगितलं, पण या आवाहनानंतर दोन्ही क्रिकेटपटूंवर टीका करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर होत असेलल्या टीकेला आता युवराज सिंगने उत्तर दिलं आहे. 'गरजूंना मदत करण्यासाठी केलेलं आवाहन काहींच्या पचनी कसं पडत नाही? हे मला समजत नाही. एका देशाच्या नागरिकांना आरोग्य सुविधा मिळावण्यासाठी मदत व्हावी यासाठी मी तो संदेश दिला होता. माझा उद्देश कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा नव्हता. मी एक भारतीय आहे. मी नेहमीच माणुसकीसाठी उभा राहिन,' असं ट्विट युवराजने केलं आहे. युवराजने केलेल्या या ट्विटला हरभजन सिंगनेही रिट्विट केलं आहे.



'हा खूप कठीण काळ आहे. आपण गरजूंना मदत करण्यासाठी एकत्र यायची हीच ती वेळ आहे. आपण आपलं कर्तव्य पार पाडतो. मी शाहिद आफ्रिदी आणि एसएएफ संस्थेचं समर्थन करतो. या संस्थेला मदत करता. घरातच राहा,' असं ट्विट युवराज सिंगने केलं होतं.




'जगातली लोकं कठीण काळातून जात आहेत. आपल्याकडून प्रयत्न केले गेले पाहिजेत. शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन चांगलं काम करत आहे. तुम्ही त्याला साथ द्या आणि जेवढी मदत करणं शक्य असेल, तेवढी मदत करा,' असं हरभजन म्हणाला होता.