`तुमच्यामुळे खेळाडू सुरक्षित घरी पोहोचले` ऑस्ट्रेलियाने मानले BCCIचे आभार
ऑस्ट्रेलियाच्या 14 खेळाडूंसह 38 सदस्य असलेली सर्व टीम ऑस्ट्रेलियामध्ये सुखरुप पोहोचली आहे.
मुंबई: IPLच्या बायो बबलमध्ये कोरोना घुसल्यामुळे खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तातडीनं IPL 2021चे पुढचे सामने स्थगित करून खेळाडूंना आपल्या घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या खेळाडूंना थेट ऑस्ट्रेलियात येण्याची बंदी घातली होती. त्यामुळे ते खेळाडू मालदीवमध्ये क्वारंटाइन होऊन तिथून ऑस्ट्रेलियापर्यंत पोहोचले. या सगळ्या प्रवासात या खेळाडूंना BCCIने खूप मोठी मदत केली आहे.
खेळाडू सुखरुप सिडनीमध्ये पोहोचल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूने BCCIचे आभार मानले आहेत. सिडनीत पोहोचलेल्या खेळाडूंना हॉटेलमध्ये 10 दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. त्यानंतरच सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या घरी जाऊ शकतील.
स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डनं BCCIचे आभार मानत म्हणाले की, 'आम्हाला आनंद आहे की ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लवकर आणि सुरक्षितपणे आपल्या घरी परतले. त्यांना पाठवण्याच्या केलेल्या व्यवस्थेबद्दल आम्ही BCCIचे आभारी आहोत.'
ऑस्ट्रेलियाच्या 14 खेळाडूंसह 38 सदस्य असलेली सर्व टीम ऑस्ट्रेलियामध्ये सुखरुप पोहोचली आहे. सर्वजण सिडनी इथे हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहणार असून त्यानंतर आपल्या घरी जाणार आहेत. IPLचे 29 सामने सध्या अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आले आहेत. चेन्नई सुपरकिंग्सचे कोच मायकल हसी यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते शुक्रवारी आपल्या घरी परतले आहेत.