Asia Cup: एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, `या` तारखेला भारत-पाकिस्तान येणार आमने सामने
महिला एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 14 खेळाडूंच्या भारतीय संघाच्या कर्णधारपादी आक्रमक फलंदाज श्वेता सेहरावतची निवड करण्यात आली आहे.
Asia Cup Team India : एशिया कप स्पर्धेवरुन बीसीसीआय (BCCI) आणि पीसीबीमध्ये (PCB) सुरु असलेल्या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पाकिस्तानात एशिया कपचं (Asia Cup) आयोजन करण्यात आलं असून बीसीसीआयाने पाकमध्ये न खेळण्याची भूमिका घेतली आहे. यावर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा (India vs Pakistan) सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवला जावा असा पर्याय पाकिस्तानने ठेवला आहे. हा वाद सुरु असताच बीसीसीआयने एशिया कपसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे.
बीसीसीआयने केली घोषणा
12 जूनपासून हॉंगकाँगमध्ये (Hongkong) खेळवल्या जाणाऱ्या एमर्जिंग महिला एशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केलीय. 14 खेळाडूंच्या या संघाचं कर्णधारपद श्वेता सहरावत हिच्याकडे सोपवण्यात आलं आहे. स्पर्धेतला आपला पहिला सामना भारत-ए संघ 13 जूनला यजमान हाँगकाँगबरोबर खेळणार आहे. पण सर्व क्रिकेट चाहत्यांचा लक्ष असेल ते भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यावर. भारत आणि पाकिस्तान दरम्यान 17 जूनला रंगणार आहे.
भारतीय महिला निवड समितीने शुक्रवारी एसीसी इमर्जिंग महिला एशिया कप स्पर्धेसाठी (Emerging Women Asia Cup) भारत-ए (India-A) संघाची निवड केली. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत. आठ संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारताचा ग्रुप ए मध्ये समावेश असून भारताशिवाय यजमान हाँगकाँग, थायलंड-ए, पाकिस्तान-ए या संघांचा समावेश आहे. तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश-ए, श्रीलंका-ए , मलेशिया आणि संयुक्त अरब अमीरात हे संघ असतील. स्पर्धेतील अंतिम सामना 21 जूनला खेळवला जाणार आहे.
भारत-ए संघात आयसीसी अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अंडर-19 महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शेफाली वर्माने कर्णधाराची भूमिका पार पाडली होती.पण आता इमर्जिंग महिला एशिया कप स्पर्धेसाठी श्वेता सेहरावतकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. श्वेताने सात सामन्यात तब्बल 297 धावा केल्या होत्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश होता.
भारत- (एमर्जिंग टीम)
श्वेता सहरावत ( कर्णधार ), सौम्या तिवारी, तृषा गोंगाडी, मुस्कान मलिक, श्रेयांका पाटील, कनिका आहूजा, उमा छेत्री, ममता मडीवाला, टिटास साधू, यशश्री एस, काशवी गौतम, पार्श्वी चोपड़ा, मन्नत कश्यप, बी अनुषा
मुख्य कोच: नूशिन अल खादीर
भारत-ए संघाचं वेळावत्रक
12 जून विरुद्ध हॉन्गकॉन्ग
15 जून विरुद्ध थाईलँड-ए
17 जून विरुद्ध पाकिस्तान-ए
भारताला एकच जेतेपद
इमर्जिंग महिला एशिया कप स्पर्धेचं हे पाचवं वर्ष आहे. सर्वात आधी 2013 मध्ये सिंगापूरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिल्याच स्पर्धेत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर 2017 आणि 2018 मध्ये सलग दोनवेळा श्रीलंकेने ट्ऱ़ॉफीवर नाव कोरलं. तर 2019 मध्ये बांगलादेशमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत पाकिस्तानने विजय मिळवला होता.