मुंबई : स्फोटक फलंदाजी करणारा सलामीवीर ख्रिस गेलची भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी - २० मालिकेत समावेश नसला तरी मर्यादित षटकांच्या लीगमध्ये त्याने तुफान फटकेबाजी केली. ग्लोबल टी - २० कॅनडा लीगमध्ये त्याने वादळी फटकेबाजी करत केवळ ५४ चेंडूत १२२ धावांची शानदार खेळी करत शतक ठोकले. या वेस्ट इंडिज खेळाडूने आपल्या खेळीदरम्यान १२ षटकार आणि सात चौकार लगावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात विनिपेग हॉक्सने शेवटच्या चेंडूवर टोरंटो नॅशनल संघाचा पराभव केला तर दुसर्‍या सामन्यात खराब हवामानामुळे मॉन्ट्रियल टायगर्सला व्हँकुव्हर नाईट्सविरुद्ध फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.



त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना व्हॅनकुव्हर नाईट्सने २० षटकांत तीन गडी बाद २७६ धावा केल्या. या टी -२० क्रिकेटमधील दुसरा मोठा धावफलक आहे. यापूर्वी अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध २७८ धावांचा विक्रम केला होता.



व्हँकुव्हर नाईट्सचा फलंदाज ख्रिस गेलने नाबाद १२२ धावांची खेळी केली. तर टोबियास व्हिसी (५१), चॅडविक वॉल्टन (२९) आणि हॅंड्रिक दासेन (५६) बाद झाले. गेलच्या या धुवावांधार फलंदाजीनंतर शाई होपने ट्विट केले आणि विचारले आहे की, “ख्रिस गेल माणूस आहे का?”



ख्रिस गेलचा भारत विरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजच्या १४ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी गेलने विश्व चषक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे सांगितले होते. परंतु या स्पर्धेदरम्यान त्याने आपले मन बदलले.