ना सचिन, ना द्रविड! 3 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश... गौतम गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11 पाहिलीत का?
All Time World XI : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली ऑल टाइम वर्ल्ड-11 निवडली आहे. गंभीरने आपल्या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या संघात एकाही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.
Gautam Gambhir All Time World 11 : श्रीलंका दौऱ्यानंतर सध्या मोठ्या ब्रेकवर आहे. सप्टेंबर महिन्यात भारत आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या दरम्यान टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Guatam Gambhir) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. गौतम गंभरीने आपली ऑल टाईम वर्ल्ड इलेव्हन (All Time World 11) निवडली आहे. यात पाकिस्तान क्रिकेटच्या तीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजच्या दिग्गज क्रिकेटर्सचाही समावेश करण्यात आला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या या संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली अशा दिग्गज भारतीयांना संघात स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भारताला 2007 आणि 2011 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरची नुकतीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयने गौतम गंभीरची या पदावर अधिकृत नियुक्ती केली.
ऑस्ट्रेलियाच्या 3 तर द.आफ्रिकाच्या दोन दिग्गजांचा समावेश
गौतम गंभीरने आपल्या ऑल टाईम 11 मध्ये सर्वात पहिलं स्थान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज विकेटकिपर-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टला संधी दिली आहे. तब्बल तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंना गंभीरने आपल्या संघात निवडलं आहे. यात गिलख्रिस्टबरोबरच ऑस्ट्रेलियाचा हुकमी सलामीवर मॅथ्यू हेडन आणि ऑलराऊंडर अँड्र्यू सायमंडला स्थान दिलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलअर्स आणि वेगवागन गोलंदाज मॉर्ने मॉर्कल या दोघांचीही संघात निवड केली आहे.
पाकिस्तानचे तीन खेळाडू
गौतम गंभीरने आपल्या ऑल टाईम वर्ल्ड इलेव्हनमध्ये पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक, दिग्गज ऑलराऊंडर अब्दुल रज्जाक आणि भेदक गोलंदाज शोएख अख्तर यांना स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन, वेस्टइंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा आणि इंग्लंडच्या अँड्यू फ्लिंटॉफचाही समावेश करण्यात आला आहे.
एकाही भारतीयाचा समावेश नाही
गौतम गंभीरच्या फेव्हरेट अकरा खेळाडूंमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, राहुल द्रविड, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, व्हीव्हीएस लक्ष्मण असे अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटला लाभले आहेत. पण यातल्या एकाही भारतीयाची निवड न करण्यात आल्याने चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11
अॅडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, एबी डिव्हिलिअर्स, ब्रायन लारा, अँड्र्यू सायमंड्स, इंजमाम-उल-हक, अब्दुल रज्जाक, मुथय्या मुरलीधरन, शोएब अख्तर, मॉर्ने मॉर्केल, अँड्र्यू फ्लिंटॉप