India vs Australia T20 Series: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेनंतर लगचेच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्याची टी-20 मालिका  खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 23 नोव्हेंबरपासून होणार असून आगामी टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतला पहिला सामना 23 नोव्हेंबरला विशाखानपट्टनममध्ये खेळवला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघाची घोषणा
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) नोव्हेंबरदरम्यान सुरु होणाऱ्या या टी20 मालिकेसाठी (T20 Series) ऑस्ट्रेलियाने संघाची (Australia Squad) घोषणा केली आहे. विकेटकिपर फलंदाज मॅथ्यू वेडला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात अनेक बदल करण्यात आले आहेत. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी स्टिव्ह स्मिथ मात्र ही मालिका खेळणार आहे. 


असं आहे वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 23 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. यातला पहिला सामना 23 नोव्हेंबरला विशाखापट्टनममध्ये होईल. तर दुसरा सामना 26 नोव्हेंबरला त्रिवेंद्रममध्ये, 28 नोव्हेंबरला तिसरा सामना गुवाहाटी, चौथा सामना 1 डिसेंबरला नागपूरमध्ये आणि पाचवा सामना 3 डिसेंबरला हैदराबादमध्ये खेळवला जाईल. या मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातही अनेक बदल होण्याची शक्यता आहे. सातत्याने क्रिकेट खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल तर युवा खेळाडूंना संधी मिळेल. 


टी20त दोन्ही संघांची कामगिरी
टीम इंडिया आतापर्यंत 179 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. यात 114 सामन्यात भारताला विजय मिळवता आलाय, तर 57 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. तर तीन सामने टाय झालेत, पाच सामन्यांचा कोणताही निकाल लागलेला नाही. ऑस्ट्रेलिया संघ आतापर्यंत 158 टी20 सामने खेळलाय. यात 82 सामन्यात विजय तर 70 सामन्यात पराभव स्विकाराला लागलाय. 


भारत आणि ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने (India vs Australia Head to Head) खेळवण्यातआले. यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. टीम इंडियाने 13 सामने जिंकलेत तर ऑस्ट्रेलियाने नऊ सामने जिंकेलत. 


ऑस्ट्रेलियाचा संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), स्टीव स्मिथ, डेविड वॉर्नर, ट्रेविस हेड, जेसन बेहरनडॉर्फ, सीन एबॉट, नाथन एलिस, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, तनवीर संघा, अॅडम झम्पा