सूर्या ब्रिगेडची `लय भारी` कामगिरी! पहिल्या टी20त रचला इतिहास... पाकिस्तानशी बरोबरी
IND VS BAN T20 1st Match : भारताने दोन सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकून बांगलादेशला धूळ चारली तर आता टी 20 क्रिकेटमध्येही भारताने रविवारी पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशच्या टीमला लोळवून विजय मिळवला.
IND VS BAN T20 1st Match : टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटनंतर आता टी 20 क्रिकेटमध्येही बांगलादेशची धुलाई करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी भारताने दोन सामन्यांची टेस्ट सीरिज जिंकून बांगलादेशला धूळ चारली तर आता टी 20 क्रिकेटमध्येही भारताने रविवारी पार पडलेल्या सामन्यात बांगलादेशच्या टीमला लोळवून विजय मिळवला. यावेळी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने बांगलादेशला ऑल आउट करून टी 20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम रचला.
सामन्यात काय काय झालं?
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स आणि हार्दिक, मयंक आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेऊन बांगलादेशला 127 वर ऑल आउट केले. टीम इंडियाला विजयासाठी 128 धावांचे आव्हान मिळाले, यावेळी हार्दिक पंड्या (39) , संजू सॅमसन (29) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (29) धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्मा आणि नितेश रेड्डी या दोघांनी प्रत्येकी 16 धावांची कामगिरी केली. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेले 128 धावांचे आव्हान अवघ्या 11.5 ओव्हरमध्ये पूर्ण केले.
पाकिस्तानच्या विक्रमाशी केली बरोबरी :
टीम इंडियाने रविवारी बांगलादेशला ऑलआउट करून विक्रम नोंदवला. यामुळे टीम इंडिया विरोधी संघाला सर्वात जास्तवेळा ऑल आउट करणारी टीम ठरली आहे. यात भारताने पाकिस्तानच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. रविवारी ग्वालियरमध्ये झालेल्या T20 सामन्यात भारताने बांगलादेशचा डाव 19.5 ओव्हरमध्ये 127 धावांत गुंडाळला. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताने विरोधी संघाला ऑलआउट करण्याची ही 42 वी वेळ आहे. यापूर्वी केवळ पाकिस्तानच्या नावावर हा रेकॉर्ड होता. पाकिस्तानने देखील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांच्या विरोधी संघाला 42 वेळा ऑलआउट केले आहे. पण भारत हा पाकिस्तानच्या तुलनेत वरचढ ठरतो कारण पाकिस्तान संघाने ही कामगिरी 245 सामने खेळून केली तर भारताने 236 व्या सामन्यातच या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारताचा फॉर्म पाहता भारत हा रेकॉर्ड देखील लवकरच मोडेल अशी शक्यता आहे.
हेही वाचा : VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकित
न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर :
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विरोधी संघाला सर्वाधिक वेळा ऑलआउट करण्याच्या बाबतीत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या नंबरवर आहे. न्यूझीलंडच्या संघाने 40 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या विरोधी संघाला ऑलआउट केलंय. तर याबाबतीत चौथ्या क्रमांकावर युगांडाचा संघ असून त्यांनी 35 वेळा विरोधी संघाला ऑलआउट केलंय. तर पाचव्या क्रमांकावर विरोधी संघाला 32 वेळा ऑल औट करणारा वेस्टइंडीजचा संघ आहे.