Real Hero : वडिलांनी कारगिलमध्ये बंदुकीने, तर मुलाने रांचीत बॅटने भारताला मिळवून दिला विजय
IND vs ENG Test: रांची कसोटी विजयाचा हिरो ठरला तो युवा फलंदाज आणि विकेटकिपर ध्रुव जुरेल. इंग्लंडविरुद्ध संयमी फलंदाजी करत ध्रुवने टीम इंडिलाया रोमहर्षक विजय मिळवून दिला. ध्रुवचे वडिल हे भारतीय लष्करात असून त्यांनी कारगिल युद्धात सहभाग घेतला होता.
Dhruv Jurel : टीम इंडियाने इंग्लंडवर पाच विकेटने मात करत रांची कसोटी सामना (Ranchi Test) आपल्या नावावर केला. या विजयाबरोबर टीम इंडियाने (Team India) पाच कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. या विजयाने टीम इंडियाने आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही (WTC) दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. रांची कसोटी विजयाचे हिरो ठरले ते युवा स्टार शुभमन गिल (Shubman Gill) आणि फलंदाज-विकेटकिपर ध्रुव जुरेल (Dhruv Jurel). ध्रुवने पहिल्या डावात 90 धावा करत टीम इंडियाला संकटातून वाचवलं. तर दुसऱ्या डावात नाबाद 39 धावा करत टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
रांचीत ध्रुव जुरेल चमकला
रांची कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाने 177 धावात 7 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी खेळपट्टीवर उभ्या असलेल्या युवा ध्रुव जुरेलने कोणतंही दडपण न घेता तळाच्या फलंदाजांना हाताश धरत टीम इंडियाला 300 धावांचा टप्पा गाठून दिला. ध्रुवने 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार मारत 90 धावा केल्या. तर दुसऱ्या डावातही भारतीय संघाची अवस्था 120 धावांवर 5 विकेट असतना ध्रुव जुरेल संकटमोचक म्हणून समोर आला. ध्रुवने शुभमन गिलबरोबर भागिदारी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
वडिल कारगिल युद्धात सहभागी
रांची कसोटीत भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या विजय-पराभवत ध्रुव जुरेल हा महत्त्वाचा दुवा ठरला. ध्रुवने आपल्या बॅटने टीम इंडियाची लाज राखली. विजय मिळवल्याशिवाय हटणार नाही या निश्चयाने ध्रुव खेळपट्टीवर उभा राहिला. ध्रुवच्या या लढ्यामागे प्रेरणा होती ती त्याच्या वडिलांची. ध्रुवचे वडिल हे कारगिल युद्धात सहभागी झाले होते.
25 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान कारगिल युद्ध (Kargil War 1999) रंगलं. भारतीय लष्करात असलेले ध्रुव जुरेलचे वडिल नेम सिंह हे सुद्धा हे या लढ्यात होते. भारतीय सीमेवर त्यांनी शत्रूचा सामना केला. सध्या नेम सिंह हे भारतीय लष्कारातून निवृत्त झालेत.
कोण आहे ध्रुव जुरेल?
ध्रुव जुरेल हा मुळचा उत्तर प्रदेशमधल्या आग्रातला आहे. 21 जानेवारी 2001 मध्ये त्याचा जन्म झाला. शाळेपासूनच त्याला क्रिकेटची आवड होती. उत्तर प्रदेशच्या अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 टीमसाठी तो खेळलाय. 2020-21 मध्ये त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत उत्तर प्रदेश संघाकडून टी20 पदार्पण केलं. ध्रुव भारताच्या 2020 अंडर-19 वर्ल्डकपच्या टीमचा एक भाग होता. या स्पर्धेत ध्रुवच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती