India vs Australia: `व्हिसा दाखवा व्हिसा....`, म्हणत टगेगिरी करणाऱ्यांना दणका
.... सामन्यादरम्यान त्यांचं हे विचित्र वागणं आणि खिल्ली उडवणं सुरूच होतं.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांदरम्यान सध्या सुरु असणाऱ्या कसोटी मालिकांच्या सामन्याचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. तिसऱ्या दिवशी गोलंदाजांची जादू पाहता हा दिवस गोलंदाजांचा होता असं म्हणायला हरकत नाही. एकिकडे दोन्ही संघांचे खेळाडू कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या संघाला साजेशा खेळाचं प्रदर्शन करत असतानातच प्रेक्षकांमध्ये मात्र काहीसं विचित्र वातावरण पाहायला मिळालं.
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे असणाऱ्या ग्रेट साऊथर्न स्टँड येथील १३ व्या रांगेत बसलेल्या काही टगेगिरी करणाऱ्यांनी show us your visa अशा घोषणा वारंवार दिल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर त्यांना 'एमसीजी'कडून तंबीही देण्यात आली. मुख्य म्हणजे विराट कोहलीलाही त्यांनी शेलक्या शब्दांत संबोधल्याचं पाहायला मिळालं होतं, इतकच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाच्य़ा खेळाडूंसाठीही चाहत्यांनी अपशब्द वापरल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळे त्यांना चांगलाच दणकाही मिळाला.
जर हे घोषणासत्र थांबलं नाही, तर येत्या काळात टगेगिरी करणाऱ्यांना मैदानातून बाहेर काढण्यात येईल, असा इशारा मैदान प्रशासनाकडून देण्यात आला. सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसापासून सुरु असणारं हे सत्र तिसऱ्या दिवशीही सुरुच असल्यामुळे अखेर काही चाहत्यांना मैदानातून बाहेरचा रस्तचा दाखवण्यात आल्याचं वृत्त 'क्रिकइन्फो'ने प्रसिद्ध केलं आहे.
'क्रिकइन्फो'कडूनच त्यांच्या उद्दामपणाचा हा व्हिडिओ मैदान प्रशासन आणि व्यवस्थापकीय मंडळाकडे देण्यात आला असल्याचं कळत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्यांनीही झाल्या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.
'कोणत्याही सामन्यादरम्यान चाहते, खेळाडू किंवा मैदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कोणत्याही प्रकारची शिवीगाळ, अपशब्द किंवा त्यांच्या वंशावरुन केली जाणारी वक्तव्यं खपवून घेतली जाणार नाहीत. याविषयी सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना सुरक्षा रक्षकांकडे तक्रार करण्याची मुभा आहे', असं प्रवक्ते म्हणाले. सोबतच काही चाहत्यांवर त्यांच्या गैरवर्तनासाठी कारवाईही करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कसोटी सामन्याच्या उर्वरित दिवसांदरम्यानही या सर्व प्रकारावर मैदान प्रशासनाची करडी नजर राहील, अशी हमीही त्यांनी दिली.
मुख्य म्हणजे मैदानात गैरवर्तन करणाऱ्यांवर क़डक कारवाई करण्यात येण्यासंबंधीच्या नियम आणि अटी नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नियमांना अनुसरुनच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे.