बंगळुरु कसोटी रद्द झाल्यास टीम इंडियाला मोठा फटका, WTC शर्यतीतून बाहेर होणार? काय आहे समीकरण
WTC Championship Point Table : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार होता. पण पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. पुढचे पाचही दिवस बंगळुरुत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
WTC 2023-25 Points Table : न्यूझीलंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन कसोटी सामन्यांची (India vs New Zealand Test Series) मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार होता. पण पावसामुळे कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे वाया गेला. पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. बंगळुरुत पावसाची संसतधार सुरु असून पुढचे पाचही दिवस हवामान विभागाने पावसाची शक्यता ( Bengaluru Weather Forecast) वर्तवली आहे.
टीम इंडियाला बसणार फटका?
बंगळुरु सामना रद्द झाल्यास टीम इंडिया (Team India) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधून (WTC) बाहेर पडणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याचं उत्तर सध्यातरी नाही असं आहे. पण हा सामना पावसाने रद्द झाल्यास भारतीय संघाचा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहचण्याचा मार्ग मात्र थोडासा कठिण होईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट टेबलमध्ये भारतीय संघ सध्या 74.24 पॉईंटसह अव्वल स्थानावर आहे. तर 62.50 पॉईंटसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे.
WTC अंतिम फेरीसाठी कसं असेल समीकरण?
भारतीय क्रिकेट संघ बंगळुरु कसोटी सामन्यानंतर डब्ल्यूटीसी हंगाम 2023- 25 मध्ये 7 कसोटी सामने खेळणार आहे. म्हणजे भारतीय संघाला या सात सामन्यांपैकी किमान तीन कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. पण त्याचबरोबर इतर संघांच्या विजयावरही लक्ष ठेवावं लागणार आहे. चार सामने जिंकल्यास टीम इंडियाचं डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीतील स्थान पक्क होईल.टीम इंडियाचे पुढचे सात कसोटी सामने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. यापैकी दोन कसोटी सामने न्यूझीलंडविरुद्ध तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिक खेळवली जाणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा हा तिसरा हंगाम आहे. 2023 ते 2025 दरम्यानच्या कसोटी सामन्यांच्या पॉईंटवर अंतिम फेरीचं चित्र स्पष्ट होणार आहे. कसोटी सामना जिंकल्यावर संघला 12, सामना ड्रॉ झाल्यास 4 आणि टाय झाल्यास 6 पॉईंट मिळणार आहेत. पॉईंटटेबलमध्ये पहिले दोन संघ अंतिम फेरी खेळतील. डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना लॉर्डस मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, आकाश दीप.
न्यूझीलंड संघ : टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), केन विलियमसन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी आणि विल यंग.