मोठी बातमी! आयपीएल स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपात 8 वर्षांचा तुरुंगवास
Cricket : क्रीडा जगतातून मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कारा केल्याचा आरोप असलेल्या नेपाळ क्रिकेट संघाचा खेळाडू संदीप लामिछानेला दोषी ठरवण्यात आलं आहे. काठमांडूतल्या एका कोर्टाने संदीपला 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Kathmandu court convicts Sandeep Lamichhane: नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछानेला बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं होतं. आता काठमांडूतल्या एका कोर्टाने याप्रकरणात संदीप लामिछानेला (Sandeep Lamichhane) 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 23 वर्षांचा संदीप हा नेपाळ क्रिकेटचा मोठा चेहरा आहे, शिवाय तो इंडियन प्रीमिअर लीगही (IPL) खेळला आहे. शिशिर राज ढकाल खंडपीठाने बुधवारी या प्रकरणात सुनावणी करताना हा निकाल सुनावला. कोर्टाने संदीपला आर्थिक दंड आणि 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
नेपाळ पोलिसांनी घेतली इंटरपोलची मदत
2022 सप्टेंबर महिन्यात 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने संदीप लामिछानेविरोधात काठमांडूतल्या एका पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या मुलीने संदीपवर बलात्काराचा आरोप (Rape Case) केला. ज्यावेळी पीडित मुलीने आरोप केला, त्यावेळी संदीप वेस्टइंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळ होता. तक्रार दाखल झाल्यानंतर संदीप लमिछानेविरोधात अटक वॉरंज जारी करण्यात आलं आणि तात्काळ देशात परतण्याचे आदेश देण्यात आले.
पण अटक वॉरंट जारी झाल्यानंतर संदीप लामिछाने फरार झाला. त्याचं ठिकाण नेपाळ पोलिसांना सापडत नव्हतं. त्यामुळे संदीपच्या अटकेसाठी नेपाळ पोलिसांनी इंटरपोलची मदत घेतली. इंटरपोलने संदीप लामिछानेविरोधात 'डिफ्यूजन' नोटिस जारी केली. घटनेच्या काही दिवसांनंतर संदीपला काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली.
संदीपने आरोप फेटाळले
अटक वॉरंट जारी होताच नेपाळ क्रिकेट असोसिएशनने संदीप लामिछानेला निलंबित केलं. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये संदीपला मोठा दिलासा मिळाला. संदीपची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर लगेचच संदीपला राष्ट्रीय संघाचे दरवाजे उघडण्यात आले. संदीपने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्याविरोध कट रचण्यात आल्याचा आरोपही संदीपने केला होता.
IPL खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू
संदीप लामिछाने नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे, जो देशातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळला आहे. आयपीएलमध्ये खेळणाराही संदीप पहिला नेपाळचा खेळाडू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग (BBL), कॅरेबियन प्रीमिअर लीग (CPL) आणि लंका प्रीमिअर लीगमध्येही (LPL) खेळला आहे.
अष्टपैलू असलेल्या संदीपला 2018 मध्ये पहिली ओळख मिळाली. अवघ्या 17 व्या वर्षात त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. दिल्ली डेअरडेव्हिल्सने संदीपव 20 लाखांच्या बेस प्राईजवर आपल्या संघात घेतलं. दिल्लीकडून खेळताना त्याने 9 सामन्यात 19 विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपने नेपाळ संघाकडून खेळाताना 52 टी20 सामन्यात 98 आणि 51 एकदिवसीय सामन्यात 112 विकेट घेतल्या आहेत.
संदीपच्या नावावर तीन वर्ल्ड रेकॉर्ड
संदीप लामिछानेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 100 विकेट घेण्याचा विक्रम आहे. संदीपने अवघ्या 42 सामन्यात 100 विकेट घेतल्या. याआधी राशिद खानने 44 सामन्यात 100 विकेट घेण्याची कामगिरी केली होती. सलग तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात संदीपने चार किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. सदीपचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18.06 चा अॅव्हरेज आहे, जो आतापर्यंतच्या गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे.