मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) पहिलावहिला ई-लिलाव मंगळवारी सुरु झालाय. पहिल्या दिवशी विक्रमी बोली लागली आहे. पहिल्या दिवशी ४४४२ कोटींची बोली लागली. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी ही बोली वाढणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय. या लिलाव प्रक्रियेत स्टार, सोनी, जिओ, फेसबूक, गूगल या मातब्बर कंपन्यांनी सहभाग घेतलाय. त्यामुळे क्रिकेट प्रसारणचे हक्क मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांतर्गत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकांसाठी  बीसीसीआयने पहिलावहिला ई-लिलाव सुरु केलाय. प्रसारण हक्कासाठी सहा कंपन्या उत्सुक आहेत. यात स्टार, सोनी, जिओ याचप्रमाणे ऑनलाइन क्षेत्रातील मातब्बर असे फेसबूक आणि गूगल यांचासुद्धा समावेश आहे. २०१२ रोजी स्टार टीव्हीने ३८५१ कोटींची बोली लावली होती. यात आता १५ टक्के वाढ झालेय. पुढील पाच वर्षांसाठी ही लिलाव प्रक्रिया सुरु झालेय. १०२ सामन्यांसाठी ही लिलाव प्रक्रिया सुरु झालेय. टीव्ही प्रसारण अधिकार याच्याशिवाय डिझीटल अधिकार याचाही समावेश आहे.


पहिली सर्वात मोठी बोली ४१७६ कोटींची होती. त्यानंतर त्यात २५-२५ कोटींची भर पडली. काही लिलाव बोली ४२०१.२० कोटी, ४२४४ कोटी, ४३०३ कोटी आणि ४३२८.२५ कोटी रुपयांदरम्यान होती. आज पुन्हा या लिलावाला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता सुरु होणाऱ्या या लिलावाकडे लक्ष लागले आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपनीला हा क्रिकेट प्रसारणाचे हक्क मिळणार आहेत. तीन वेळा बोली लागल्यानंतर लिलाव प्रक्रिया थांबिवण्यात येणार आहे. तीन कंपन्यांनी लिलावात सहभाग घेतलाय. स्टार, जिओ आणि सोनी टीव्हीचा समावेश आहे. त्यानंतर तांत्रिकबाब म्हणून फेसबूक, गूगल आणि यप या सोशल मीडिया कंपन्या जिंकणाऱ्या कंपनीसोबत करार करतील.


बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मीडियाला सांगितले की, स्टारजवळ त्यांचे डिजिटल मंच हॉटस्टार आहे. त्यांची फेसबूक किंवा हॉस्टस्टार सोबत भागेदारी होण्याची शक्यता नाही.  दरम्यान, सोनी यांच्यासोबत ग्रुप तयार करु शकते. गूगलकडे यूट्युब आहे. बीसीसीआयच्या कार्यप्रणालीमध्ये आतापर्यंत बंद लिफाफ्यातील प्रक्रिया अस्तित्वात होती. मात्र प्रशासकीय समितीकडून यावेळी प्रथमच पारदर्शी ऑनलाइन निविदा प्रकिया राबवण्यात येत आहे. लिफाफाबंद प्रक्रियेत एकदाच किंमत टाकली जायची. 


ई-लिलाव प्रक्रियेत कंपन्यांना निश्चित केलेल्या टप्प्यांमध्ये वाढीव बोली लावण्याची परवानगी असेल. ही प्रक्रिया सायंकाळी ६ पर्यंत पूर्ण न झाल्यास पुढील दिवशीसुद्धा चालवण्यात येईल. एप्रिल २०१८ ते मार्च २०२३ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी हे प्रसारण हक्क विकण्यात येत आहेत. भारतीय संघ पुढील वर्षांच्या कालावधीत २२ कसोटी, ४२ एकदिवसीय आणि ३८ ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.  


स्टारने भारतातील सर्वात प्रतिष्ठेच्या आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या प्रक्षेपणाचे हक्क विक्रमी १६ हजार ३४७ कोटी रुपयांना मिळवले होते. स्टारकडे आयसीसीचा ट्वेन्टी-२० विश्वचषक (पुरुष व महिला), एकदिवसीय विश्वचषक (पुरुष व महिला) आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या प्रक्षेपणाचे अधिकार आहेत.