WTC: बुमराह नंबर 1, तर आजी-माजी कर्णधाराला मागे टाकत पंतचा हा कारनामा
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा
मुंबई : टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Panta) यांनी आपली छाप उमटली आहे. जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये नंबर 1 गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
तर ऋषभ पंतने टॉप ५ फलंदाजांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये, भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत 517 धावांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे पंतने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांनाही मागे टाकलं आहे.
बुमराह नंबर वन गोलंदाज
जसप्रीत बुमराहने बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या डे नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या डावात त्याने आतापर्यंत एक विकेट घेतली आहे. दुसरीकडे, ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात 39 धावा केल्या तर दुसऱ्या डावात 28 चेंडूत अर्धशतक ठोकून इतिहास रचला.
पंत आता भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. डे नाईट कसोटीत आतापर्यंत अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आलेली नाही. या दोन डावांच्या जोरावर पंतने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टॉप 5 फलंदाजांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.
जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्मात
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-2023 मध्ये, जसप्रीत बुमराह 9 मॅचमध्ये 38 विकेट्स घेत टॉपवर आहे. बुमराहने तीनदा 5 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम कामगिरी 24 धावांत 5 विकेट अशी आहे, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने हा कामगिरी केली. जसप्रीत बुमराहसह मोहम्मद शमीदेखील अव्वल 5 गोलंदाजांमध्ये आहे, ज्याच्या नावावर 30 विकेट आहेत.
याशिवाय इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन 32 विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा 30-30 विकेट्ससह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
कोहली रोहितला टाकलं मागे
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत, परिणामी ते जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडले आहेत. पण भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत 517 धावांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या यादीत केएल राहुल 541 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर जो रूट 1008 धावांसह अव्वल स्थानावर असून पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत शतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजानेही 512 धावांसह अव्वल 5 खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे.