न्यूझीलंडकडून टीम इंडियाची धुलाई, आधी फलंदाजांना लोळवलं मग गोलंदाजांना रडवलं
IND VS NZ 1st test : गुरुवारी दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने टीम इंडियाला घाम फोडून आधी फलंदाजांना लोळवलं आणि मग गोलंदाजांनाही आपल्या जबरदस्त फलंदाजीने रडवलं.
IND VS NZ 1st test : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना हा बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम पार पडत आहे. सामन्याच्या पहिला दिवशी पावसाने बॅटिंग केल्याने टॉस सुद्धा होऊ शकला नाही. तर गुरुवारी दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने टीम इंडियाला घाम फोडून आधी फलंदाजांना लोळवलं आणि मग गोलंदाजांनाही आपल्या जबरदस्त फलंदाजीने रडवलं.
टीम इंडियाने नावावर केला नकोस विक्रम :
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजी समोर टीम इंडियाचे फलंदाज एका मागोमाग एक बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. टीम इंडियाकडून सुरुवातीला यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी मैदानात उतरली. तेव्हा यशस्वी 13 तर रोहित अवघ्या 2 धावांवर ऑल आउट झाला. त्यानंतर ऋषभ पंत (20) वगळता कोहली (0), सरफराज खान (0), केएल राहुल (0), रवींद्र जडेजा (0), आर अश्विन (0) इत्यादी तब्बल 5 फलंदाज शुन्यावर बाद झाले. तर कुलदीपने 2, बुमराहने 1 तर सिराजने 4 धावा केल्या. परिणामी टीम इंडियाला 46 धावांवर ऑल आउट व्हावे लागले.
टीम इंडिया पहिल्यांदाच घरच्या मैदानात खेळल्या टेस्ट सामन्यात 50 हून कमी धावा करून बाद झाली. यापूर्वी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात एका टेस्ट सामन्यादरम्यान टीम इंडिया 32 धावांवर ऑल आउट झाली होती. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील एका इनिंगमध्ये केलेला टीम इंडियाचा हा तिसरा सर्वात कमी स्कोअर आहे.
हेही वाचा : दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठी घडामोड, गांगुली आणि पॉन्टिंग बाहेर, 'या' दोन दिग्गजांची एन्ट्री
टीम इंडियाच्या गोलंदाजांना आणले नाकीनऊ :
टीम इंडिया 46 वर ऑल आउट झाल्यावर न्यूझीलंडला देखील अशाच प्रकारे आउट करण्याचा मनसुबा टीम इंडियाच्या गोलंदाजांचा होता. मात्र तो अक्षरशः फेल ठरला. टॉम लॅथम आणि देवोन कॉन्वे यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची पार्टनरशिप केली. त्यानंतर कुलदीपने 17 व्या ओव्हरला टॉम लॅथमची (15) विकेट घेतली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी सुद्धा विल यंग आणि देवोन कॉन्वे यांनी मोठी पार्टनरशिप केली. विल यंगला रवींद्र जडेजाने (33) कॅच आउट केले. देवोन कॉन्वे 91 धावा करून शतकाच्या उंबरठ्यावर असताना आर अश्विनने त्याला बोल्ड आउट केले. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस न्यूझीलंडने 3 विकेट्स गमावून 180 धावा केल्या आणि 134 धावांची आघाडी घेतली.
हेही वाचा : आयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली समोर, कुठे आणि कधी होणार आयोजन?
भारताची प्लेईंग 11 :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके