भारतीय क्रिकेटमधली मोठी बातमी, रोहित शर्मा `या` स्पर्धेनंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर करणार? कोचचा खुलासा
Rohit Sharma : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आहे. आता रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करु शकतो, असं विधान रोहित शर्माचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं आहे.
Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जून 2024 मध्ये टी20 वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला होता. या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त (Retirement) होत असल्याचं जाहीर केलं. यानंतर त्याने कसोटी आणि एकदिवसीय लक्ष केंद्रीत केलं आहे. पण आता लवकरच रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याचं बोललं जातं आहे. रोहित शर्माचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) यांनी रोहितच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीबाबत वक्तव्य केलं आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. टीम इंडियाचं अंतिम फेरीचं तिकिट जवळपास निश्चित मानलं जात आहे. अशात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर रोहित शर्मा निवत्ती जाहीर करु शकतो अशी चर्चा रंगली आहे. यावर दिनेश लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
WTC नंतर रोहित शर्मा निवृत्त?
प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहित शर्मच्या निवृत्तीच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चॅम्पियनशिपनंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो असंही दिनेश लाड यांनी म्हटलं आहे. रोहित शर्माचं वाढतं लक्षात घेता रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. कारण एकदिवसीय क्रिकेटसाठी त्याला फिट राहावं लागेल. रोहित शर्मा 2027 चा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळेल असा विश्वासही दिनेश लाड यांनी व्यक्त केला आहे.
2027 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप रोहित खेळणार?
2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केली होती. टीम इंडियाने स्पर्धेत सलग 10 सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. पण विजयापासून एक पाऊल दूर राहिले. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं. आता पुढच्या एकदिवसीय वर्ल्ड कप चार वर्षांनी म्हणजे 2027 मध्ये खेळवला जाणार आहे. तोपर्यंत रोहित शर्मा 39 वर्षांचा होईल. अशात एकदिवसीय क्रिकेटसाठी फिट राहायचं असेल तर त्याला कसोटी क्रिकेटमधून बाहेर पडावं लागेल, असं दिनेश लाड यांनी म्हटलंय.
वर्ल्ड कप पराभवानंतर रोहित निराश
2023 एकदिवसीय वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर रोहित शर्मा प्रचंड निराश झाला होता. आपल्या नेतृत्वात देशाला एकतरी आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्याचं स्वप्न होतं. त्याच आत्मविश्वासाने तो पुन्हा मैदानात उतरला. 2024 मध्ये त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी20 वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली.