IPL 2024 दरम्यान टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर, जाणून घ्या कधी आणि किती सामने
आयपीएलदरम्यान टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया पाच कसोटी सामने खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
IND vs AUS Test Series Schedule: देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीगची धूम आहे. बीसीसीआयने (BCCI) नुकतंच आयपीएलचं पूर्ण वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार तब्बल दोन महिने आयपीएल (IPL2024) स्पर्धा रंगणार आहे. 22 मार्चला सुरु आलेल्या आयपीएलचा 26 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यानंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे. तर टी20 वर्ल्ड कप नंतर वर्षअखेरीस टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा
भारतीय क्रिकेट संघ या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा (India Tour of Australia) करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये रंगणार आहे. त्यानंतर 6 डिसेंबरला दुसरा कसोटी सामना एडिलेटमध्ये होईल. एडिलेडमधला कसोटी सामना पिंक बॉल म्हणजे डे-नाईट रंगणार आहे. ब्रिस्बेनमधल्या गाबा मैदानावर दोन्ही संघांदरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जाईल. तर 26 डिसेंबर म्हणजे बॉक्सिंग डेला चौथा कसोटी सामना होईल. 3 जानेवाराली भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानचा पाचवा आणि शेवटचा सामना रंगेल.
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
पहिला कसोटी सामना : 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दूसरा कसोटी सामना : 6-10 डिसेंबर, एडिलेड (डे-नाइट)
तीसरा कसोटी सामना : 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथा कसोटी सामना : 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवा कसोटी सामना : 3-7 जानेवारी, सिडनी
1991-92 नंतर पहिला मोठा दौरा
1991-92 पहिल्यांदाच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. 1991-92 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 4-0 असा पराभव केला होता. पण गेल्या चार कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करलेला नाही. यात ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघाने सलग दोन मालिका जिंकण्याची किमया केली आहे. 2018-2019 आणि 2020-21 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला होता.
भारताआधी ऑस्ट्रेलिया पाकिस्तानला भिडणार
दरम्यान, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. याचं वेळपत्रकही जाहीर करण्यात आलंय. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान नोव्हेंबर महिन्यात 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामने खेळवले जाणार आहेत. याचदरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणआर आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.