Video Bowler And Batter Fight On Cricket Pitch: क्रिकेट हा जंटलमन्स गेम म्हणजेच सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र या खेळातही खेळाडूंनी एकमेकांना खुन्नस देणे, शिवागाळ किंवा अगदी धक्काबुक्कीपर्यंतची प्रकरणं यापूर्वी पहायला मिळाली आहेत. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं या साऱ्याचा कळस गाठला असून क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळपट्टीवर फलंदाजाने चक्क गोलंदाजाच्या अंगावर उडी घेत त्याला खेळपट्टीवर लोळवत त्याच्यावर बुक्क्यांचा वर्षाव केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


नेमकं झालं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर एमसीसी विकडेस बॅश XIX च्या पर्वाचा समारोप मागील आठवड्यामध्येच झाला. एरोव्हिसा क्रिकेट आणि राबदान क्रिकेट क्लबदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यामध्ये स्कोअरकार्ड आणि निकालाऐवजी मैदानात झालेली फ्री स्टाइल हाणामारीच जास्त चर्चेत राहिली. राबदानचा फलंदाज कासिफ मोहम्मद आणि एरोव्हिसाचा गोलंदाज नासीर अली या दोघांमध्ये हा वाद झाला. 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नासीरने कासिफला बाद केलं. त्यानंतर नासीरने कासिफसमोर जात अगदी आरेरावीमध्ये सेलीब्रेशन करत त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. बाद झाल्यानंतर कासिफ तंबूकडे जात असताना नासिरने त्याच्या समोर जाऊन अगदी मुठी आवळत आरडाओरड करत सेलीब्रेशन केलं. नासिरने कासिफला शिवीवगाळ केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतरही कासिफ सुरुवातीला शांतच होता. 


संयम सुटला अन्...


मात्र काही क्षणानंतर कासिफचा संयम संपला आणि त्याने हातातली बॅट फेकून थेट नासिरवर उडी घेतली. पंच आणि इतर खेळाडू या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाच नासिरने कासिफला मारण्यासाठी त्यानेच फेकलेली बॅट वापरण्याचा प्रयत्न केला. या नंतर या दोघांमध्ये अगदी खेळपट्टीवर पडून झटापटी झाली. पंचांबरोबरच इतर खेळाडू आणि अगदी मैदानाबाहेरुन पळत आलेल्या सोपर्टींग स्टाफनेही या दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यांची हाणामारी सुरुच होती. या साऱ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...



कठोर कारवाईची मागणी


या प्रकरणानंतर या दोन्ही खेळाडूंविरुद्ध काही कारवाई करण्यात आली आहे की नाही याबद्दलचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. मात्र असं असतानाच अशाप्रकारे मैदानात हाणामारी करणं क्रिकेटपटूंना शोभत नसल्याचं अनेक चाहत्यांनी म्हटलं असून दोघांना केवळ समज न देता कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला या प्रकरणामध्ये नेमकी चूक कोणाची वाटतेय? कमेंट करुन नक्की सांगा.