...म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटीनंतरच Virat Kohli ची माघार
संघाची पुढील रणनिती कशी असणार?
मुंबई : IPL 2020 च्या १३ व्या हंगामाचा शेवट झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. एव्हाना संघाची या दौऱ्यासाठीची रणनिती आखण्यासही सुरुवात झाली असणार यात शंका नाही. पण, याचदरम्यान आता दौरा सुरु होण्यापूर्वीच Virat Kohli माघार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
Australia दौऱ्यादरम्यानच पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट मायदेशी परतणार असल्याची माहिती समोर येत आहे. पत्नी अनुष्का शर्मा Anushka Sharma हिच्या प्रसुतीची तारीख त्यादरम्यानच असल्यामुळं बाळाच्या जन्माच्या वेळी आपण पत्नीसमवेत असावं या कारणासाठी विराटनं पॅटर्निटी लिव्हची मागणी केली होती. BCCI कडून त्याची ही मागणी मान्य करण्यात आली असून, त्याला ठराविक काळासाठी संघातून रजा दिली आहे.
परिणामी, १७ डिसेंबरला ऍडिलेड येथे होणाऱा पहिला कसोटी सामना खेळला गेल्यानंतर विराट भारतात परतणार आहे. उर्वरित सामन्यांसाठी त्याची नेमकी उपस्थिती असणार आहे की नाही याबाबत मात्र अद्यापही स्पष्टोक्ती नाही. पण, त्याची अनुपस्थिती मात्र नक्कीच जाणवेल यात शंका नाही. शिवाय यादरम्यानच्या काळात संघाची नेमकी रणनिती कशी असेल हे पाहणंही महत्त्वाचं असेल.
विराट मायदेशी परतल्यानतंर संघाच्या कर्णधारपदाची धुरा कोणाकडे असेल हा प्रश्नही अनेकांच्या मनात घर करत आहे. संघाच्या उप कर्णधारपदी असणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारकिर्दीत अतिशय कमी कालावधीत यशशिखरावर पोहोचणाऱ्या विराट कोहली याच्या जीवनात एक नवं वळण येऊ पाहत आहे. पत्नी अनुष्का शर्मा आणि विराट त्यांच्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. चाहतेही या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.