अंबाती रायडू CSK चा नवा कर्णधार? सलग दुसऱ्या पराभवानंतर जडेजाचं कर्णधारपद धोक्यात
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात काही फार चांगली झालेली नाही.
मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात काही फार चांगली झालेली नाही. लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर चाहत्यांनी नवा कर्णधार रविंद्र जडेजाला यासाठी जबाबदार धरलं आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून आता कर्णधार बदलण्याची मागणी केली जातेय.
लखनऊविरुद्धच्या सामन्यात, टॉस गमावल्यानंतर, चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजी केली. टीमची धावसंख्या 210 पर्यंत नेण्यात टीमच्या प्रत्येक फलंदाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ टीमची सुरुवात चांगली झाली. पण मधल्या ओव्हरमध्ये सीएसकेने सामन्यात कमबॅक केलं.
मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये रवींद्र जडेजाने एक चुकीचा निर्णय घेतला. ज्यामुळे टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. 19वी ओव्हर जडेजाने शिवम दुबेकडे दिली आणि शिवमने यामध्ये 25 रन्स दिले. यानंतर सोशल मीडियावर एकच गदारोळ माजला आणि रविंद्र जडेला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणी होताना दिसतेय.
Ravindra Jadeja च्या कॅप्टन्सीवर भडकले चाहते
यावेळी सोशल मीडियावर एका युझरने अंबाती रायडूला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे. तर काही युझर्सने धोनी आणि जडेजा यांची कर्णधार म्हणून तुलना केली आहे.
एका युझरच्या म्हणण्यानुसार, तुम्ही टीममध्ये दीर्घकाळापासून आहात याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला कर्णधार केलं पाहिजे. ब्राव्हो जडेजापेक्षा चांगला कर्णधार होऊ शकतो, असंही म्हटलं गेलंय.