जेव्हा महेंद्रसिंग धोनी संतापतो, बाटलीवर लाथ मारुन दूर उडवलं; CSK च्या स्टार खेळाडूने केलं उघड; `आम्ही डोळे खाली करुन...`
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) कॅप्टन कूल (Captain Cool) म्हणून ओळखलं जातं. मात्र एका क्षणी तो इतका संतापला होता की खेळाडूंना त्याच्याशी डोळे मिळवतानाही भिती वाटत होती.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (MS Dhoni) कॅप्टन कूल (Captain Cool) म्हणून ओळखलं जातं. मैदानात आणि मैदानाबाहेरही प्रत्येक स्थिती शांततेत हाताळत असल्याने त्याला ही उपाधी मिळाली आहे. त्याच्या याच स्वभावाचा फायदा त्याला एक महान कर्णधार बनवण्यात मदतशीर ठरल्या. धोनी भारतीय संघाचा एकमेव कर्णधार आहे ज्याने तिन्ही मोठ्या आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. यामध्ये आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी, एकदिवसीय वर्ल्डकप आणि टी-20 वर्ल्डकपचा समावेश आहे. इतकंच नाही तर धोनीने आयपीएलमध्ये चेन्नई संघाला पाचवेळा ट्रॉफी जिंकवून दिली आहे.
दरम्यान भारतीय आणि चेन्नई संघाचा माजी खेळाडू आणि धोनीचा सहकारी सुब्रहमण्यम बद्रीनाथ याने धोनीचा एक किस्सा सांगितला आहे. यामध्ये जर धोनी संतापला तर तो किती संतापतो हे त्याने सांगितलं आहे. 'तोदेखील एक माणूस आहे. त्याचादेखील संयम तुटतो,' असं त्याने सांगितलं.
पुढे तो म्हणाला की, "पण हे कधीच मैदानात झालेलं नाही. तो कधीच विरोधी संघाला आपण संतापलो आहोत हे दाखवत नाही. बंगळुरु विरोधातील सामन्यात आम्ही 110 धावांचा पाठलाग करत होतो. पण आम्ही एकामागोमाग विकेट्स गमावले आणि सामना गमावला".
"मी अनिल कुंबळेच्या गोलंदाजीवर बाद झालो होतो. मी पायचीत झालो. मी ड्रेसिंग रुममध्ये उभा असताना, तो आत येत होता. यावेळी तिथे पाण्याची एक बाटली होती. त्याने त्या बाटलीला जोरात लाथ घातली. आम्ही कोणीही तिच्या डोळ्यात डोळे मिळवण्याची हिंमत करु शकत नव्हतो," असं बद्रीनाथने सांगितलं.
आयपीएलचा मेगा लिलाव आता काही महिन्यांवर आहे. दरम्यान धोनी या हंगामात आयपीएल खेळणार नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. धोनी फिट नसल्याने तो आता खेळणार नाही असे अंदाज वर्तवले जात आहेत. दुसरीकडे धोनीनेही यावर मौन बाळगलं आहे.
मेगा लिलाव असल्याने जर चेन्नई संघाला धोनीला कायम ठेवायचं असेल तर फारच आव्हानात्मक असेल. 43 वर्षीय धोनीने ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता तो आयपीएलमधूनही निवृत्ती घेण्याच्या जवळ आहे. जर चेन्नईने धोनीला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तर एक जागा भरल्याने लिलावात संघर्ष करावा लागले. पण धोनीला संघात न ठेवण्याची जोखीमही ते स्विकारणार नाहीत.