CWG 2022 : सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत 2022 मध्ये भारताला मिळालेल्या यशामुळे खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महिला कुस्तीपटू दिव्या काकरनने (Divya Kakran) 68 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले आहे. त्यानंतर दिव्या काकरनवर सोशल मीडियावर खूप अभिनंदनाचा वर्षाव झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी दिव्याचे अभिनंदन केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनीही दिव्या काकरनचे अभिनंदन केले. पण त्यांना मिळालेल्या प्रत्युत्तरामध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे.


भारताची युवा कुस्तीपटू दिव्या काकरन हिने कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत महिला कुस्ती स्पर्धेत 68 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले. यासाठी अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर दिव्या काकरन हिने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या अभिनंदनाला उत्तर देताना दिल्ली सरकारकडून कोणतेही बक्षीस किंवा मदत न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.


दिव्या काकरनने रविवारी एकामागून एक ट्विट करत म्हटले की, "पदकाबद्दल माझे अभिनंदन केल्याबद्दल दिल्लीच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार. माझी तुम्हाला एक विनंती आहे की मी गेली 20 वर्षे दिल्लीत राहत आहे. येथे मी कुस्तीचा सराव करत आहे, परंतु आजपर्यंत मला राज्य सरकारकडून कोणतेही बक्षीस किंवा कोणतीही मदत मिळालेली नाही. माझी तुम्हाला एवढी विनंती आहे की, तुम्ही ज्या प्रकारे दिल्लीचे असूनही दुसऱ्या राज्यांसाठी खेळणाऱ्या खेळाडूंचा सत्कार, तसाच माझाही सन्मान झाला पाहिजे."



यासोबतच दिव्याने 2018 सालचा एक व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, काळाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसते. सर्व काही पूर्वीसारखेच आहे, माझ्यासाठी कालही काही केले नाही आणि आजही.



दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कॉमनवेल्थ स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. "शाब्बास पैलवान. कॉमनवेल्थ स्पर्धेत आमच्या कुस्तीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. कुस्तीमध्ये भारताला एकाच दिवसात एकूण 6 पदके मिळाली, त्यापैकी 3 सुवर्ण आहेत. साक्षी मलिक आणि दीपक पुनिया यांचे सुवर्ण आणि दिव्या काकरन आणि मोहित ग्रेवाल यांचे कांस्यपदकासाठी खूप खूप अभिनंदन," असे केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, दिव्या काकरनने महिलांच्या 68 किलो वजनी टोंगाच्या टायगर लिलीला अवघ्या 26 सेकंदात पराभूत करून कांस्यपदक जिंकले. दिव्या काकरनला मात्र नायजेरियाच्या ब्लेसिंग ओबोरुद्दूकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला