कोलंबो : श्रीलंकेमध्ये इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५०० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये श्रीलंकेचा क्रिकेटपटू दासुन शनाका थोडक्यात बचावला आहे. या हल्ल्यानंतर दासुन शनाका अजूनही धक्क्यात आहे. घराबाहेर पडायलाही त्याला भीती वाटत आहे. इस्टर संडेच्या दिवशी ३ चर्च आणि फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले. या हल्ल्यात १० भारतीयांचाही मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२७ वर्षांचा ऑलराऊंडर दासुन शनाकाने क्रिकइन्फोला सांगितलं, 'मी मोठा प्रवास करून एक दिवस आधीच घरी आलो होतो. त्यामुळे नेगोम्बोमधल्या सेंट सेबस्टियन चर्चमध्ये प्रार्थना करायला गेलो नाही.' या चर्चवरही दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात शनाकाची आजी आणि आई जखमी झाल्या आहेत.


'मी अशावेळी चर्चमध्ये जातो, पण मी खूप थकलेलो होतो. त्यादिवशी सकाळी मी घरीच होतो. मी धमाक्याचा आवाज ऐकला आणि धावत चर्चकडे गेलो. ते दृष्य मी कधीही विसरू शकत नाही. चर्चमध्ये सगळं छिनविछिन्न अवस्थेत पडलेलं होतं. नागरिकांची पार्थिव बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. ते सगळं बघितल्यानंतर आजी जिवंत असेल, असं मला वाटलंच नव्हतं, पण देवाच्या कृपेने ती जिवंत आहे. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. सध्या ती रुग्णालयात आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. आईला थोडीशी दुखापत झाली आहे,' असं दासुन शनाका म्हणाला.


दासुन शनाका श्रीलंकेकडून ३ टेस्ट, १९ वनडे आणि २७ टी-२० मॅच खेळला आहे. 


श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटातून अनिल कुंबळे थोडक्यात वाचला