मुंबई: क्रिकेट आणि अंडरवर्ल्डचं खूप जुनं नातं आहे असं म्हटलं जातं. कपिल देव ज्यावेळी भारतीय संघाचे कर्णधार होते. त्यावेळीचा हा किस्सा आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी दाऊद इब्राहिम टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊदने कपिल देव यांना महागड्या वस्तूही ऑफर केल्या होत्या. मात्र ड्रेसिंग रूममधून कपिल देव यांनी दाऊदला फटकारलं आणि तिथून निघून जाण्यास सांगितलं. हा किस्सा आहे 1987 मध्ये शारजाहमध्ये झालेल्या सामन्यापूर्वी दाऊदने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी दाऊदने एक ऑफर दिली होती. जर पाकिस्तानच्या खेळाडूंना पराभूत करून दाखवलं तर सर्व खेळाडूंना टोयोटा कार गिफ्ट देईन असं त्यावेळी दाऊद म्हणाला होता. 


टीम इंडियाने ही ऑफर स्वीकारली नाही. या संदर्भातील किस्सा टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी केला होता. BCCIचे माजी सचिव जयवंत लेले यांनी आपल्या पुस्तकात या ऑफर बद्दलचा खुलासा केला होता. 


कपिल देव यांनी दाऊदला ड्रेसिंग रूमबाहेर काढलं


दिलीप वेंगसरकर यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, कपिल देव पत्रकार परिषद संपवून ड्रेसिंग रूममध्ये परतले होते. त्यावेळी टीम इंडियातील खेळाडूंशी त्यांना बोलायचं होतं. तेव्हा त्याची नजर दाऊदवर पडली. त्यावेळी कपिल देव यांनी दाऊदला ड्रेसिंग रूममधून बाहेर काढलं. दाऊदही कोणताही वाद न घालता बाहेर गेला. त्यावेळी जाता जाता तो म्हणाला कार कॅन्सल.


जावेद मियांदादने दिला होता इशारा


वेंगसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रेसिंगरूममध्ये पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मिंयादाद आले. त्यांनी कपिल यांना सांगितलं की दाऊद सोबत तुम्ही जे वागालात ते योग्य नव्हतं. मिंयादाद यांच्या म्हणण्यानुसार कपिल देव यांना माहिती नव्हतं की तो दाऊद इब्राहिम आहे. मियांदाद यांचे दाऊदसोबत संबंध होते अशीही माहिती नंतर समोर आली. 


कपिल देव यांनी मागितली होती माफी


या सगळ्या प्रकरणानंतर कपिल देव यांनी ज्या पद्धतीनं दाऊदला ड्रेसिंग रूममधून बाहेर काढलं त्यासाठी माफी मागितली. मात्र दाऊदची कोणतीही ऑफर त्यांनी किंवा टीम इंडियातील खेळाडूंनी स्वीकारली नाही. रवि शास्त्री यांच्या म्हणण्यानुसार दाऊद वरचेवर असा यायचा. शारजाह इथेही भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी तो आला होता असं त्यांनी सांगितलं होतं. 


शारजाहच्या प्रत्येक पार्टीत दाऊदचा सहभाग?


मनिंदर सिंह यांच्या म्हणण्यानुसार दाऊद केवळ एका सामन्यासाठी नाही तर तिथे होणाऱ्या प्रत्येक पार्टीमध्ये तो सहभागी व्हायचा. त्यावेळी मॅच फिक्सिंगबाबत एवढं काही माहिती नव्हतं. त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये येण्याची बंदीही नव्हती.