दिल्लीचं चुकलंच, पण अंपायर्सच्या मनमानीचं काय? चाहते संतापले
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात (IPL 2022 Match 34) मोठा राडा झाला.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात (IPL 2022 Match 34) मोठा राडा झाला. हा सामना दिल्ली विरुद्ध राजस्थान (DC vs RR) यांच्यात खेळवण्यात आला. नो बॉलवरुन भरसामन्यात हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या सर्व राड्यामुळे जवळपास 3 मिनिटं खेळात व्यत्यय आला. दिल्लीचा कॅप्टन रिषभ पंतने (Rishabh Pant) आपल्या फलंदाजांना माघारी बोलावलं. तर डीसीचे कोच प्रवीण आमरे (Pravin Amre) नो बॉल न दिल्याने थेट अंपायर्स विरुद्धच भिडले. (dc vs rr ipl 2022 no ball controversy netizens demanded punish and fine against umpire due to poor umpiring)
आमरे आणि कॅप्टन पंत यांनी नियमांचं उल्लंघन केलं. यामुळे या दोघांसह शार्दुल ठाकूर विरुद्धही मोठी कारवाई करण्यात आली. मात्र यात अंपायर्सची काही चुकीच नव्हती का? पंचांच्या आडमुठेपणाबाबत कोणी बोलणार आहे का, तसेच अंपायर्सच्या या खराब पंचगिरी विरुद्ध बीससीआय कोणती कारवाई करणार का, असा संतप्त सवाल आता क्रिकेट चाहते उपस्थित करत आहेत.
नक्की लफडा काय?
राजस्थान दिल्लीला विजयासाठी 223 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. दिल्लीही पद्धतशीर खेळत होती. दिल्लीला शेवटच्या 20 व्या ओव्हरमध्ये 36 धावांची गरज होती. दिल्लीकडून मैदानात रॉवमेन पॉवेल आणि कुलदीप यादव हे दोघे होते.
राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने ही शेवटची निर्णायक आणि महत्त्वाची ओव्हर ओबेड मॅकॉयला दिली. दिल्लीला पॉवेलकडून अपेक्षा होत्या. दिल्लीला विजयासाठी 6 बॉलमध्ये 6 सिक्सची कोणत्याही परिस्थितीत गरज होती.
आव्हान अवघड वाटत होतं, मात्र ते अशक्य नव्हतं. राजस्थानच्या जिंकण्याची शक्यता अधिक होती. मात्र पॉवेल मैदानात होता. पॉवेलने एकामागोमाग एक असे सलग 3 खणखणीत सिक्स खेचले. सामना रंगतदार स्थितीत पोहचला.
आता दिल्लीला 3 बॉलमध्ये 18 धावा पाहिजे होत्या. मकॉयने चौथा बॉल टाकला. मात्र तो पॉवेलच्या कंबरेवर फुलटॉस होता. त्यामुळे नो बॉल आहे, असं डगआऊटमधील दिल्ली टीमचं मत होतं. तसंच पॉवेलनेही हा नो बॉल देण्यात यावा, अशी मागणी फिल्ड अंपायर नितीन मेननकडे केली.
मात्र अंपायर आपल्या निर्णयावर ठाम होते. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीही आक्रमक झाली होती. अंपायरचा नो बॉल न देण्याचा दिल्लीला काही पटला नाही.
यावरुन या वादाला तोंड फुटलं. पंत रागाने लालबुंद झाला होता. बाउंड्री लाईनवरुन त्याने आपल्या फलंदाजांना परत या असा इशारा केला. तसेच पंतने त्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या अंपायरसोबतही हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. पंत तावातावाने अंपायरसोबत बोलत होता.
तर दुसऱ्या बाजूला कोच प्रवीण आमरे थेट मैदानातच घुसले आणि अंपायरशी भिडले. त्यांनी अंपायरने नो बॉल न देण्याच्या निर्णयावरुन संताप व्यक्त केला.
तर याचवेळी डगआऊटमधील मराठमोळ्या शार्दुल ठाकूरनेही या निर्णयाविरोधात आपल्या कृतीतून नाराजी व्यक्त केली. सामन्यात जवळपास 3 मिनिटांचा व्यत्यय आला.
स्टेडियममधील चाहतेही अंपायर विरुद्ध 'चिटर-चिटर' बोलू लागले. नो बॉलवरन ठिणगी पेटली होती. मात्र इतका राडा होऊनही फिल्ड किंवा थर्ड अंपायरनेही हा खरंच नो बॉल आहे की नाही, हे तपासण्याची तसदी घेतली नाही.
अंपायर्सच्या याच आडमुठेपणा विरुद्ध क्रिकेट चाहते संतापले आहेत.
प्रवीण आमरे, पंत आणि ठाकूर या तिकडीने नियमांचं उल्लंघन केलं. यामुळे या तिघांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. मात्र अंपायर्सच्या या खराब निर्णयाविरुद्ध काही कारवाई करणार का, असा संतप्त सवाल या निमित्ताने चाहते उपस्थित करत आहेत.