लंडन : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. पण या सीरिजआधीच भारताला धक्का लागला आहे. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे टी-२० सीरिजमधून बाहेर झाले आहेत. या दोघांऐवजी कृणाल पांड्या आणि दीपक चहरची टी-२० सीरिजसाठी निवड झाली आहे. तर वनडे सीरिजसाठी अक्सर पटेलला संधी देण्यात आली आहे. वॉशिंग्टन सुंदर याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो टी-२० सीरिजमधून बाहेर झाला आहे. मंगळवारी मलाहाईडमध्ये फूटबॉलचा सराव करत असताना सुंदरला दुखापत झाली. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक सुंदरवर उपचार करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० दरम्यान फिल्डिंगवेळी बुमराहच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर बुधवारी बुमराह सरावासाठी आला पण त्यानं सराव केलाच नाही. बुमराहचं बोट फ्रॅक्चर झाल्याचं स्कॅनिंगमध्ये स्पष्ट झालं आहे. त्यामुळे बुमराहऐवजी दीपक चहर आणि वॉशिंग्टन सुंदरऐवजी कृणाल पांड्याला टी-२०मध्ये संधी देण्यात आली आहे.


भारत आणि इंग्लंडमध्ये पहिले ३ टी-२० आणि मग ३ वनडे मॅचची सीरिज होणार आहे. १२ जुलैपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. वनडे सीरिजलाही बुमराहला मुकावं लागलं तर भारतासाठी हा मोठा धक्का असेल.


टी-२० सीरिजसाठी भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, एम.एस.धोनी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव